सोलापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात तीन वर्षांपूर्वी झालेल्या ७२ लाखांच्या अफरातफरी प्रकरणी नऊ अभियंत्यांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात दक्षिण सोलापूर, मंगळवेढा व अक्कलकोट या तीन तालुक्यांमध्ये रस्त्यांच्या कामात खोटा व बनावट दस्तऐवज तयार करून अभियंत्यांनी शासकीय निधीचा अपहार केल्याचा प्रकार १७ सप्टेंबर २००९ ते ३१ मार्च २०११ या कालावधीत घडला होता. या प्रकरणी जि. प. बांधकाम विभागातील तत्कालीन कार्यकारी अभियंता आर. एस.गोवडे यांच्यासह मधुकर सूळ, एस. सी.कदम, व्ही. वाय. कोंडगुळे, ए. बी. आराध्ये, बी. जे. दहिवडे, डी. एस. पवार, एस. पी. बाचेटी व एस. बी. मुल्ला या अभियंत्यांविरुद्ध सोलापूर न्यायालयात दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते सूर्यप्रकाश कोरे यांनी खासगी फिर्याद दाखल केली होती. त्यावर सुनावणी होऊन सकृतदर्शनी शासकीय निधीचा अफरातफर झाल्याचे दिसून आल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार सदर बझार पोलीस ठाण्यात सूर्यप्रकाश कोरे यांची फिर्याद दाखल करून घेण्यात आली.
दक्षिण सोलापूर, मंगळवेढा व अक्कलकोट तालुक्यात रस्त्यांच्या कामांसाठी जि. प. बांधकाम विभागातील तत्कालीन संबंधित अभियंत्यांनी ७१ लाख ९७ हजार २३७ रुपये इतका शासनाचा निधी खर्च केला. प्रत्यक्षात रस्त्यांची कामे झालीच नव्हती. कागदोपत्री रस्त्यांची कामे पूर्ण केल्याचे भासविण्यासाठी खोटी कागदपत्रे तयार करून शासकीय निधीची अफरातफर करण्याचा संबंधित कार्यकारी अभियंता ते शाखा अभियंत्यापर्यंत सर्व नऊ जणांनी कट रचला. त्याप्रमाणे आर्थिक घोटाळा करून शासनाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्ह्य़ात अद्यापि एकाही अभियंत्याला अटक झाली नसून पुढील तपास पोलीस करीत आहेत.