राजकीय कार्यकर्त्यांमध्ये गुन्हेगारांचे आकर्षण वाढत आहे, पण ते कधीकधी घातकही ठरते. रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष भीमा बागूल यांना हेच भोवले. थेट सहभाग नसताना गुन्ह्यात गोवले जाऊन तुरुंगात जावे लागले. त्यापासून शहरातील अन्य कार्यकर्त्यांनी बोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
आदेश लोखंडे याचा खून गावठी पिस्तुलातून झाला असे फिर्यादीत म्हटले आहे. पण औरंगाबाद येथील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यात लोखंडे याला गोळी लागल्याच्या खुणा नाहीत, डोक्यात लोखंडी रॉड अथवा जड वस्तूने मारहाण केल्याने रक्तस्राव होऊन आदेशचा मृत्यू झाला, असे अहवालात म्हटले आहे. मृत आदेशवर कोल्हार येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. टिळकनगर येथील लक्ष्मण सोनवणे यांच्या वस्तीला बंदोबस्त देण्यात आला आहे.
पूर्वी शहरावर राजकीय नेत्यांचे वर्चस्व होते. आता हळूहळू त्यांचा प्रभाव कमी होऊन गुन्हेगारांचा प्रभाव वाढू लागला आहे. पूर्वी गुंडांचा वापर काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते करत, पण आता चोर व दरोडेखोरांचा वापर काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून केला जाऊ लागला आहे. गुन्हेगारांच्या वीसहून अधिक टोळय़ा शहरात कार्यरत आहे. हे गुन्हेगार राज्यातच नव्हेतर देशात वॉन्टेड आहेत. कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरात, केरळ येथील पोलीस या गुन्हेगारांना ताब्यात घेण्यासाठी शहरात येतात. पण स्थानिक पोलिसांचे सहकार्य मिळत नसल्याने त्यांना हात हलवत परत जावे लागते. आता अनेक गुन्हेगारांकडे लाखो रुपयांची संपत्ती जमा झाली आहे. या गुन्हेगारांना राजकीय प्रतिष्ठेचे आकर्षण आहे.
रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष भीमा बागूल यांनी आर्थिक परिस्थिती जेमतेम असतानाही कार्यकर्ता म्हणून पक्षात काम केले. खासदार रामदास आठवले यांची मर्जी संपादन केली. त्यांना जिल्हाध्यक्षपद मिळाले. पक्षाचे संघटन चांगले केले. सर्व जातिधर्माशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते, पण गुन्हेगारांचे आकर्षण त्यांना भोवले. कुख्यात गुन्हेगार चन्या बेग याचा भाऊ सोन्या बेग याला त्यांनी पक्षाचे उपाध्यक्ष केले. त्याला पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड, विजय वाकचौरे यांच्यासह अनेकांनी विरोध केला होता. त्याला न जुमानता बागूल यांनी पद दिले. खुनाच्या घटनेच्या दोन दिवस आधी हा निर्णय झाला. बेग याच्या वाढदिवसानिमित्त शहरात शेकडो फलक लागले. त्याने पोलीस हादरून गेले. त्यानंतर शुभेच्छाफलकावरील नावे असलेल्या तरुणांवर गुन्हे नोंदविण्यात आले. अद्यापही पोलिसांनी या गुन्हेगारांना अटक केलेली नाही.
सागर भोसले याने पूर्वी मित्राचा खून केला होता. त्यातून तो निदरेष सुटला. त्याला बागूल यांनी रिपब्लिकन पक्षाच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्षपद दिले. भोसले याच्या गुन्हेगारी कारवाया सुरू होत्या. आदेश लोखंडेचा खून किरकोळ कारणावरून करण्यात आला. मात्र त्याला खंडणी वसुलीचेही संदर्भ आहेत.