• ताप निदानासाठी जिल्हाभर केंद्रे
  • संसर्ग तोडण्यासाठी तत्काळ औषधोपचार

पालघर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात करोनाची लक्षणे जाणवल्यानंतरही तत्काळ तपासणी होत नसल्याने करोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. ही साखळी तोडण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने गावागावांत तापतपासणी करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्र यासह सर्व आरोग्य संस्थांमध्ये दिवसातील विशिष्ट वेळेत ‘ताप निदान’ तपासणी करण्यात येणार आहे. लक्षणे जाणवल्यास रुग्णाला तत्काळ मोफत औषधोपचार सुविधा पुरवण्यात येणार आहे. यात ग्रामीण भागातील खासगी डॉक्टरांनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील संशयित रुग्णांचे नमुने मुंबई येथे तपासणीसाठी पाठवण्यात येत असून तपासणी अहवाल प्राप्त होण्यास चार ते पाच दिवसांचा अवधी लागत आहे. परिणामी या दरम्यान अनेक रुग्ण गंभीर होऊन त्यांना प्राणवायू व रेमडेसिविर इंजेक्शनची गरज भासत असल्याचे दिसून आले आहे. अनेक तापाचे रुग्ण खासगी डॉक्टरांकडे गेल्यास त्यांना सर्वसाधारण गोळ्या दिल्या जात असल्याने त्यांची प्रकृती गंभीर होत असल्याचे आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले आहे.

पालघर जिल्हा आरोग्य विभागाकडे विषाणू प्रतिबंधक गोळ्यांचा मुबलक साठा असून आजारावर लवकर नियंत्रण मिळवण्यासाठी ही विशेष योजना आखण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी दिली. या योजनेअंतर्गत प्रतिजन तपासणी करून करोना संसर्गाचे लवकर निदान झाल्यास रुग्णांना तातडीने सर्व औषधोपचार विनामूल्य पुरवण्याची सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आजारावर नियंत्रण येण्यास मदत होईल, असे जिल्हा प्रशासनाला वाटत आहे.

तापाच्या प्रत्येक रुग्णाची प्रतिजन तपासणी करण्यात येणार आहेत. या चाचणीमध्ये करोना संसर्ग झाल्याचे आढळल्यास रुग्णांना विषाणू प्रतिबंधक, मल्टिविटामिन (जीवनसत्त्व) व तापाच्या गोळ्या विनामूल्य वितरित करण्यात येणार आहेत. खासगी डॉक्टरांना या योजनेत सहभागी करून घेण्यात येणार असून नागरिकांना विनामूल्य औषधोपचार मिळावा यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी दिली.

पालघर तालुक्यातील वाढणाऱ्या करोना रुग्णांची संख्या पाहता बोईसर येथील दोन खासगी रुग्णालयांना करोना उपचाराची परवानगी देण्यात आली आहे. त्याच बरोबरीने सफाळा येथील इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत करोना काळजी केंद्र उभारण्यात येणार असून एडवण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये करोना रुग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे. या दोन्ही केंद्रांची पाहणी आरोग्य तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली.

वसई-विरार शहरातील रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यात खासगी रुग्णवाहिकांकडून वाजवीपेक्षा अधिक दर आकारले जात आहेत. खासगी रुग्णवाहिका मनमानीपणे पैसे रुग्णांकडून वसूल करत असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. ग्रामीण भागातील रुग्णसेवेसाठी रुग्णवाहिकाच उपलब्ध नसल्याने सध्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचा आधार घ्यावा लागत आहे.  आता त्यासुद्धा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे रुग्णांना काही वेळ ताटकळत थांबावे लागत आहे.

काळजी केंद्रातील रुग्णांकरिता राखीव खाटा

करोना संसर्ग झालेल्या ४५ वर्षांवरील रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्याऐवजी करोना काळजी केंद्रामध्ये दाखल करण्यासंदर्भात निर्देश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. करोना काळजी केंद्रामध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांना आवश्यकता भासल्यास करोना उपचार केंद्रात किंवा करोना समर्पित रुग्णालयातील पाच टक्के खाटा संस्थात्मक विलगीकरणातील रुग्णांसाठी आरक्षित ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले असून यामुळे संस्थापक विलगीकरण्यास प्रोत्साहन मिळणार आहे.