दिगंबर शिंदे

शेती उद्योग यंदा परतीच्या पावसाने उद्ध्वस्त झाला. हातातोंडाला आलेली खरिपाची पिके, डोकीवर कर्जाचा डोंगर असलेल्या द्राक्ष, डाळिंबाच्या बागा, गोडाधोडाची दिवाळी होईल म्हणून केलेले सोयाबीन, ऊस, मका पाण्यात गेले.

जिल्ह्य़ाचा दुष्काळी भाग म्हणून गणल्या गेलेल्या खानापूर, आटपाडी, मिरज पूर्व भाग, जत, कवठेमहांकाळ या दुष्काळी तालुक्यांत यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाला. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जून, जुलै या महिन्यातच समाधानकारक पाऊस झाला होता. पोषक पाऊस आणि हवामान असल्याने सोयाबीन, मका या पिकांनी चांगलेच बाळसे धरले. खुरपणी, निंदणी करण्यासाठी उघडीपही मनासारखी दिल्याने पिकेही जोमदार आली होती. जिल्ह्य़ात सुमारे दहा हजार हेक्टर क्षेत्रावरील खरिपाची पिके, बागायती पिके जमीनदोस्त झाली. याची दाद सरकारकडून घेतली जाणार का, हा प्रश्न आहे.

गेल्या आठवडय़ात सतत पाऊस सुरू होता. त्यामुळे वाळलेल्या सोयाबीनच्या शेंगा तुटून मात्र होण्याचा धोका टळला होता. बुधवारी सकाळपासून पावसाने जोर धरला अन् सोयाबीन हातचे गेले.

अशीच कथा मिरज तालुक्यातील खटावच्या सुभाष तेलीची. पदव्युत्तर शिक्षण घेत बीएड झालेला. गेली दहा वर्षे सांगलीच्या महाविद्यालयात तासिका तत्त्वावर काम करणारा शिक्षक. टाळेबंदीमुळे शाळा बंदच. शाळेत तासच होत नाहीत, मग मानधन कुठले? तरीही जिद्दीच्या सुभाषने घरच्या दोन एकरांत मका केला. चांगले ५० कट्टा मका झाला. अजून त्याचा बाजार करायचा होता. दुसऱ्या तुकडय़ातला मका काढल्यावर बाजारात न्यायचा आणि गेल्या वर्षी बोअरसाठी घेतलेले कर्ज फेडून दिवाळी मजेत करायची हा विचार. मात्र परतीच्या पावसात मकाही गेला आणि मक्याचा कडबाही कुजला. हताशपणे केलेला खर्च वाया तर गेलाच, पण गुदस्ता घेतलेल्या बोअरच्या पशाची फेड करायची कशी, याची चिंता मागे राहिली.

अशा कैक कहाण्या यंदाच्या मोसमी पावसाने जिल्ह्य़ाच्या विविध भागांत घडल्या आहेत. कोणाची द्राक्ष बाग दावण्याच्या करात दाढेत सापडली, तर कुणाच्या बागेतील डाळिंब कुजली, तर कुणाची केळी भुईसपाट झाली. तोडणीला आलेला ऊस भुईसपाट झाला.

शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन बेमाप पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी आढावा बठकीत दिले आहेत. तर राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनीही जतमध्ये झालेल्या बठकीतही तसेच आदेश दिले आहेत. मात्र तलाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीचे फोटो काढून पाठवा, बघू भरपाईचे, असे सध्या सांगत आहेत. हा उंटावरून शेळ्या राखण्याचा प्रकार सुरूच आहे. आदेश कागदोपत्री राहतात, चावडीत बसलेले सातबाऱ्यावर पीकपाणी लावून येणारी संभाव्य मदत आपल्या ताटातच कशी पडेल यासाठी खटपटी करीत बसणार आणि शेतकरी मात्र वावरात चगाळचोथा बाहेर काढून रान मोकळे करायच्या तयारीत आहे. त्यामुळे नुकसान झालेल्यांना मदतीची प्रतीक्षा आहे.