दिगंबर शिंदे

करोना महासाथीमुळे सध्या सर्वत्र प्रतिकारक्षमता वाढीचा बोलबाला सुरू झाला. त्यामुळे एरवी आहारात दुर्मीळ झालेल्या खपली गव्हाच्या मागणीत यंदा अचानक मोठी वाढ झाली. पौष्टिक मूल्य भरपूर असलेल्या या गव्हाचे किरकोळ विक्रीचे दर किलोमागे ६० रुपयांवरून १२० रुपयांवर पोहोचले आहेत. खिरीसाठीच्या पॉलिश केलेल्या खपली गव्हासाठी आता दीडशे रुपये मोजावे लागत आहेत.

सांगली ही खपली गव्हाची एक प्रमुख बाजारपेठ आहे. येथे खपली गव्हाच्या सौद्यांना नुकतीच सुरुवात झाली . यंदाच्या हंगामातील पहिल्या सौद्यामध्ये चिकोडी येथील शेतकऱ्याच्या खपली गव्हाला तब्बल सात हजार  रुपये दर मिळाला. सध्या बाजारात किमान साडेसहा हजार रुपये क्विंटलचा दर असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले.

खपली गहूविषयी..

कृष्णाकाठची काळी कसदार जमीन आणि हवामान या खपली गव्हासाठी पोषक असल्याने याच परिसरात प्रामुख्याने याची लागवड केली जाते. मात्र त्याच्या उत्पादनासाठी अन्य गव्हापेक्षा ३० दिवस अधिक कालावधी लागतो. याचे दर हेक्टरी उत्पादनही कमी होते.  यामुळे अनेक शेतकरी या पिकासाठी उत्सुक नसतात. साध्या गव्हाच्या तुलनेत अधिक दर असल्याने मागणी अल्प प्रमाणात असते. यामुळे उत्पादन घेतले तरी त्यापासून उत्पन्न मिळेलच याचीही खात्री नसते. यामुळे या गव्हाचे उत्पादन थोडेच होते.

सांगली ही या गव्हाची मुख्य बाजारपेठ असून येथे सध्या रोज पन्नास टन खपली गव्हाची विक्री होत आहे. वर्षांकाठी एकटय़ा सांगलीतून तब्ब्ल तीन हजार टन खपली गव्हाची उलाढाल होते. सध्या मागणी वाढली तरी याचे उत्पादन तेवढेच असल्याने या गव्हाच्या दरात दुपटीपर्यंत वाढ झाली. – विवेक शेटे, व्यापारी, सांगली</p>

महत्त्व काय?

करोनाकाळात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी बेदाणे, मनुके, हिरव्या पालेभाजा, अंडी, दूध या जोडीनेच खपली गव्हाचा वापर वाढला. या गव्हापासून तयार केलेला सांजा, शिरा, चपाती, खीर असे पदार्थ सध्या आहारात सेवन केले जात आहेत. यामुळे या गव्हाच्या मागणीत अचानक वाढ झाली. मात्र खपली गव्हाचे उत्पादन मर्यादित असल्याने यंदा त्याच्या दराने थेट दुप्पट किंमत धारण केली आहे.