शहरातील रुग्णालयांच्या खाटांची सद्य:स्थिती समजणार

वसई : शहरातील करोना रुग्णसंख्या वाढत असून कुठल्या रुग्णालयात खाटा शिल्लक आहेत याची माहिती नागरिकांना मिळत नव्हती. यासाठी पालिकेचा उशिरा का होईना ‘डॅशबोर्ड’ तयार झाला आहे.  https://vvcmcbed.palghar.info  या लिंकवर क्लिक केल्यानंतर नागरिकांना कुठल्या रुग्णालयात खाटा शिल्लक आहेत, याची माहिती मिळू शकणार आहे.

वसई-विरार शहरात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दररोज ८०० ते ९०० नवीन रुग्ण आढळून येत आहेत. शहरात सध्या ३५ खाजगी रुग्णालयात आणि पालिकेच्या करोना केंद्रावर उपचार केले जात आहेत. मात्र या रुग्णालयात किती खाटा आहेत, अतिदक्षता विभाग आहे का? प्राणवायूची सोय आहे का? याची माहिती मिळत नव्हती. यासाठी रुग्णालयांतील खाटांची सद्य:स्थिती दर्शविणारी माहिती असलेला ‘डॅशबोर्ड’ तयार करावा अशी मागणी करण्यात येत होती. परंतु पालिकेने वर्ष उलटूनही कार्यवाही केलेली नव्हती.

वर्षांच्या सुरुवातीला करोनाचे संक्रमण कमी झाल्यावर पालिकेने तर उपाययोजनांकडे दुर्लक्षच केले होते. आता रुग्ण वाढल्याने खाटा मिळविण्यासाठी ससेहोलपट होऊ लागली होती. पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी देखील याबाबत पालिकेला निर्देश दिल होते. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी खाटांची स्थिती दर्शविणारे (बेड अव्हेलिबिलिटी पोर्टल) तयार करून दिल्यानंतर पालिकेने आपला ‘डॅशबोर्ड’ तयार केला आहे. यामध्ये कुठल्या रुग्णालयात किती खाटा शिल्लक आहेत, त्याची माहिती मिळेल. तर तासाला ती अद्ययावत केली जाते.

https://vvcmcbed.palghar.info. . या लिंगवर दर तासांनी ही माहिती अद्ययावत करण्यात येत असल्याचे पालिकेने सांगितले.  एरवी कुठे खाटा आहेत का त्याची माहिती रुग्णांच्या नातेवाईकांना नसायची. परंतु आता या ‘डॅशबोर्ड’चा मोठा फायदा होणार असल्याचे पालिकेने सांगितले.