कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचे ‘निसर्ग’ चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता असून येत्या ४८ तासात हे वादळ रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीवरील भागात धडकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छिमारांना खोल समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच ३ जूनला घरातच राहून जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.

जिल्ह्यात सोमवारी पहाटे अनेक भागात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळल्या. दिवसभर ढगाळ वातावरण कायम होते. अशातच प्रादेशिक हवामान विभागाने दुपारनंतर सतर्कतेचा इशारा दिला. कोकण किनारपट्टीवर तयार झालेले चक्रीवादळ ३ जूनला रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर ते दमण दरम्यानच्या परिसरात धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आल्या आहेत. अलिबाग आणि श्रीवर्धन येथे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मुरुड येथे तटरक्षक दलाची तुकडी तैनात असणार आहे. उरण येथे सागर सुरक्षा बलाचे जवान कार्यरत असणार आहेत. कोलाड येथील रिव्हर राफ्टिंग पथकांना मदतीसाठी तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. किनारपट्टीवर कच्च्या घरात राहणाऱ्या व्यक्तींना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी गावागावात उभारण्यात आलेल्या विलगीकरण कक्ष, समाजमंदीर आणि ग्रांमपचायत इमारतींचा वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले आहे.

मच्छिमारांना खोल समुद्रात जाण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. तर किनारपट्टीवरील गावांना सतर्कता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तीन तारखेला नागरीकांनी जनता कर्फ्यू पाळून घरातच सुरक्षित रहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. स्थानिकांनी समुद्र किनाऱ्यांवर जाऊ नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. आपत्कालिन परिस्थितीत ०२१४१-२२२११८ अथवा १०९३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.