गोविंदा रे गोपाळा च्या गजरात शहरात सोमवारी दहीहंडीचा थरार पाहायला मिळाला. दुपारी झालेल्या गोकुळ दूध संघाची दहीहंडी शिरोळच्या गोडी विहीर पथकाने पहिल्याच प्रयत्नात फोडून ५१ हजार रुपयांचे बक्षीस पटकविले. या पथकाने केलेली सहा थरांची रचना लक्षवेधी ठरली. तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक बक्षिसाची म्हणून मानली जाणारी धनंजय महाडीक युवा शक्तीची दहीहंडी फोडण्यासाठी ऐतिहासिक दसरा चौकात गोविंदा पथकांमध्ये चुरस लागली होती. तीन लाख रुपये बक्षिसाची दहीहंडी कोण फोडणार याची उत्कंठा हजारो उपस्थितांना लागली होती.
शहरात अनेक ठिकाणी दहीहंडीचे आयोजन केले जाते. गोकुळची दहीहंडी दुपारी १ वाजता आयोजित केली होती. तर उर्वरित दहीहंडींना दिवस मावळल्यावर सुरुवात झाली. शिरोळ, गडिहग्लज व तासगांव येथील गोविंदा पथक गटागटाने शहरात वाद्याच्या गजरात फिरत होते. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची दहीहंडी ही मानाची समजली जाते. त्यामुळे प्रत्येक वर्षी ही हंडी फोडण्यात चुरस असते.
यंदा ही हंडी फोडण्यासाठी शिरोळचे चार आणि कुटवाड, तासगावचे प्रत्येकी एक संघ आले होते. सर्वच पथकांनी पाच थरांची सलामी दिली. त्यानंतर खरा थरार सुरू झाला. गोकुळच्या दहीहंडीकरिता सहा संघांनी नावनोंदणी केली होती. यामध्ये शिवगर्जना तासगाव, अजिंक्यतारा शिरोळ, गोडीविहीर शिरोळ, जय महाराष्ट्र शिरोळ, नृसिंह कुटवाड आणि हनुमान तालीम शिरोळ यांचा समावेश होता. प्रत्येक गोविंदा पथकाने पाच थरांची सलामी दिल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात शिरोळच्या अजिंक्यताराने सात थर रचले, मात्र त्यांचा अंदाज चुकल्याने थर कोसळले. त्यानंतर शिरोळच्याच गोडीविहीर पथकाने पहिल्याच प्रयत्नात सहा थर रचले आणि संजय गोधडे या गोिवदाने ही हंडी फोडली. या पथकाला ५१ हजाराचे बक्षीस देण्यात आले. हंडी फोडताच गोिवदानी एकच जल्लोष करत नृत्याचा ठेका धरला. या वेळी गोकुळचे संचालक सुरेश पाटील, विश्वास पाटील, रवींद्र आपटे, पी. दि. धुंदरे, दिनकर पाटील कार्यकारी संचालक डी.व्ही.घाणेकर यासह अन्य नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.