भगवान गडावर दसरा मेळावा घेण्यासाठी कोणत्याही व्हीआयपीला परवानगी द्यायची नाही, असा ठराव गडाचे महंत नामदेव शास्त्री आणि गडाचे ट्रस्टी यांनी एकमताने केला आहे. त्यामुळे भगवान गडावर दसरा मेळावा घेणाऱ्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना यावर्षीही गडावर दसरा मेळावा घेता येणार नाही. गतवर्षीप्रमाणे यंदाही पंकजा मुंडे दसरा मेळावा गडाच्या पायथ्याला घेणार की गोपीनाथ गडावर मेळाव्याला सुरुवात करणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पंकजा मुंडे यांना याबाबत विचारले असता अद्याप त्यांच्याकडून कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. पुण्यातील कार्यक्रमात देखील त्यांना दसरा मेळाव्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी वेळ आल्यावर निर्णय घेऊ, असे म्हटले होते.

३० सप्टेबरला दसरा आहे. भगवान गडाचे भक्त सर्व जाती धर्माचे तसेच सर्वपक्षीय आहेत. त्यांच्या भावना दुखावल्या जाऊ नये, यासाठी कोणाला भगवान गडावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी द्यायची नाही, अशी भूमिका घेण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी दसरा मेळावा घेण्याची परवानगी कोणाला देऊ नका, असे पत्र गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला पाठवले आहे. यंदा कोणत्याही व्हीआयपीला आमंत्रित न करता साधेपणाने दसरा मेळाव्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.  पंकजा मुंडे आणि गडाचे महंत नामदेव शास्त्री गेल्या वर्षी दसरा मेळाव्यावरून आमने-सामने आले होते. शास्रीच्या विरोधामुळे पंकजा मुंडे यांना गडाच्या पायथ्याला दसरा मेळावा घ्यावा लागला होता. यावर्षी मात्र त्यांनी कुठे मेळावा घेणार याबाबतची भूमिका जाहीर केलेली नाही. यंदा भगवानगडाच्या पायथ्याला दसरा मेळावा होणार की गोपीनाथ गडावर, याबाबतची चर्चा सुरु आहे.