कुटुंबकलहामुळे दुरावलेल्या मायलेकीची अखेर भेट

दोन-अडीच वर्षांची रेश्मा. पोटाची खळगी भरण्यासाठी आई-वडिल तिच्यासह रायगडमधून कर्नाटकात स्थलांतरित झाले. आई-वडिलांच्या वादात ती भरडली गेली. सततच्या भांडणाला कंटाळून तिची आई घर सोडून गेली. वडिलांनी तिला तिच्या आजीकडे सांभाळण्यास दिले. मायेला पोरकी झालेल्या रेश्माबाबत सामाजिक कार्यकर्त्यां उल्का महाजन यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मायलेकीची भेट घडवून आणली. यामुळे दोन वर्षांनी रेश्माला मायेची उब मिळाली आहे.

गरिबी, निरक्षरता आणि वैवाहिक कलह यांच्यातून दुरावलेल्या मायलेकींची ही कहाणी आहे रायगड जिल्ह्य़ातील कोलाडमधील. कातकरी वाडीवर राहणाऱ्या २३ वर्षीय मंगलाचा चार वर्षांपूर्वी महेश पवार यांच्याशी विवाह झाला. दोन वर्षांपूर्वी त्यांना कन्यारत्न झाले. त्यांनी रेश्मा असे तिचे नाव ठेवले. मात्र, पोटाची खळगी कशी भरायची हा यक्षप्रश्न दोघांपुढे होता. दोघांनी कामासाठी स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. कर्नाटक एका जंगलातील कोळसा खाणीत दोघांनी मजूूर म्हणून काम सुरू  केले. याचदरम्यान मंगल आणि महेश यांच्यात वादाची ठिणगी पडली. संतापाच्या भरात मंगलने घर सोडले आणि जंगलात निघून गेली. ती परत आलीच नाही. महेशने तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण ती सापडली नाही. आईच्या ओढीने दुरावलेल्या रेश्माचे हाल सुरू  झाले. मायेसाठी पोरकी झालेली लेक ओक्साबोक्सी रडू लागली. महेशलाही काही सुचेना. रडणाऱ्या पोरीची समजूत कशी काढावी कळेना. शेवटी तो गावाकडे परतला आणि रेश्माला आजीकडे सांभाळायला दिले.

रागाच्या भरात घराबाहेर पडलेल्या मंगलचा राग शांत झाला तेव्हा तिने घरी परतायचा निर्णय घेतला. मात्र, जंगलात हरवल्याने ती भरकटली. त्यात भाषेचा अडसर असल्याने तिला कोणाशी संवादही साधता येईना. गावोगाव भटकत असताना तिला चिकमंगलूर येथील एका घरात मराठी बोलण्याचा आवाज आला. तिने त्या घरात जाऊन आपली व्यथा सांगितली. त्या कुटुंबाने स्थानिक पोलिसांना याबाबतची कल्पना दिली. वयाने लहान वाटत असल्याने त्यांनी तिची रवानगी महिला व बालकल्याण विभागाकडे केली. कर्नाटक येथील महिला व बालकल्याण विभागाने कोलाड येथे मंगलच्या कुटुंबीयांचा शोध सुरू केला. मात्र मंगलने आई-वडिलांचा जो पत्ता दिला ते घर बंद स्थितीत आढळून आले. मंगलच्या वडिलांच्या निधनानंतर आई घर सोडून गेल्याचे सांगण्यात आले. सासरचा पत्ता सापडत नसल्याने कर्नाटकमधील पोलीस अधिकाऱ्यांनी शोधमोहीम थांबवली आणि मंगलचा ताबा रायगड महिला व बालकल्याण विभागाकडे दिला.  त्यांनी मंगल हिला पेझारी येथील बालग्राममध्ये पाठवून दिले. आईच्या मायेसाठी आसुसलेल्या रेश्माचे रडणे सहा महिन्यांनंतरही थांबले नव्हते. तिची आजी सुरेखा तिला सामाजिक कार्यकर्त्यां उल्का महाजन यांच्याकडे घेऊन आली. या मुलीच्या आईचा शोध घ्या, अशी विनंती त्यांनी केली. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर मंगलला रायगडच्या महिला बालकल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती महाजन यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी बालकल्याण समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश ठाकूर यांची भेट घेतली. मंगलाला भेटण्याची परवानगी मागितली. तिथे दुरावलेल्मायलेकींची भेट झाली. जवळपास दोन वर्षांच्या भेटीनंतर मायलेकीच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.