सहावीतल्या हर्षदाची वडिलांच्या वेतनासाठी मुख्यमंत्र्यांकडे आर्त साद; एसटी कर्मचाऱ्यांच्या वेदनांनी समाजमन सुन्न

नितीन पखाले, लोकसत्ता

यवतमाळ : ‘पगार नसल्यामुळे माझे पप्पा नेहमी विचारात असतात. आमच्यासोबत बोलत नाहीत. काही विचारायला गेले तर रागवतात. दोन महिन्यांपासून पगार नसल्याचे सांगतात. घरातील सर्व धान्य संपले आहे. दुकानदाराने उधारी देणे बंद केले आहे. आता तुम्हीच सांगा आम्ही काय करावे? आम्हाला आमच्या पप्पांना असे चिंतेत पाहिल्या जात नाही. ते तणावाखाली असून चुकीचे पाऊल उचलू शकतात!’

हर्षदा प्रमोद पंधरे या इयत्ता सहावीत शिकणाऱ्या मुलीचे हे वेदना कथन. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार करा म्हणून तिने मुख्यमंत्री, परिवहन मंत्र्यांना केलेल्या विनंतीचा हा व्हीडीओ सर्वत्र प्रसारित झाला आणि गेल्या काही महिन्यांपासून वेतनाविना महाराष्ट्राच्या लोकवाहिनीवर निस्सीम सेवा देणाऱ्या राज्य परिवहन कर्मचाऱ्यांचे हाल जगासमोर आले. राज्य परिवहन विभागातील चालक, वाहक व अन्य कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांपासून वेतन नाही. करोना काळात बसफेऱ्या बंद असल्याने महसुलात झालेली तूट राज्य परिवहन विभागास आणखीच खोलात घेऊन गेली आहे. वेतन नसले तरी चालक, वाहकांचे कर्तव्य मात्र सुरूच आहे. वेतनाविना अनेकांच्या घरी एकवेळ चूल पेटण्याची समस्या निर्माण झाली आहे. आधीच तुटपंजे वेतन, त्यात ते नियमित होत नसल्याने परिवहन विभागातील असंख्य कर्मचाऱ्यांचे जगणे हर्षदाने मांडलेल्या व्यथेतून व्यक्त झाले आहे. वेतनाअभावी आलेल्या तणावात चालक असंख्य प्रवाशांची ने-आण करतात. हा एकप्रकारे शासन व परिवहन विभाग प्रवाशांच्या जीवाचाच सौदा करीत असल्याची प्रतिक्रिया एसटी कर्मचाऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.

प्रमोद पंधरे हे यवतमाळ आगारात दहा वर्षांपासून चालक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून वेतन नसल्याने ते सतत चिंतेत आहेत. त्यांना मुलींच्या शिकवणीचे शुल्क देणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांनी मुलींच्या शिकवण्या बंद करण्याचा निर्णय घेतला. घरात पत्नी रूपाली, आठवीत शिकत असलेली मुलगी वैष्णवी आणि सहावीत शिकत असलेली हर्षदा असा परिवार आहे. आम्ही लोकांना सतत सेवा देतो. पण आमचे वेतन केले जात नाही. आम्ही काय पाप केले? एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत शासन, संघटना सातत्याने आश्वासन देत आहे. मात्र वरच्या पातळीवर काय चालले काही कळायला मार्ग नाही. त्यामुळे आम्हीही आता इतरांसारखी आत्महत्या करायची का, असा प्रश्न प्रमोद पंधरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केला. एसटीतील कर्मचारी मुलांच्या शाळा, शिकवणीचे शुल्क, ऑनलाईन शिक्षणासाठी डाटा विकत घेण्याचा आणि वेळप्रसंगी घरात कोणी आजारी पडले तर औषधांचा खर्चही करू शकत नसल्याची खंत यवतमाळ आगारातील वाहक मनोज महल्ले यांनी व्यक्त केली. प्रमोद पंधरे यांच्या मुलीने हिंमत करून तिच्या वेदना समाजमाध्यमावर मांडल्या. तिचा हा आवाज राज्यकर्त्यांपर्यंत पोहचून एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन होईल, अशी अपेक्षा महल्ले यांनी व्यक्त केली.