सफाळे गावातील पश्चिमेला असणाऱ्या सुमारे साडेचार ते पाच हजार एकर क्षेत्रात पसरलेल्या साडे तीनशे कोळंबी प्रकल्पांमध्ये उत्पादन घेण्याच्या वेळी चोरीचे व लुटीचे प्रकार वाढत चालेले आहेत. सध्या लहान व मध्य्म आकाराच्या तळ्यामधून लाखो रूपयांच्या कोळंबीची चोरी भरदिवसा होत आहे. या बाबत कोळंबी प्रकल्पांच्या मालक वर्गाने पोलिसांकडे अनेकदा तक्रारी केल्या असल्या, तरी त्यावर उपायोजना आखली जात नसल्याने, हा व्यवसाय सुरू ठेवणे प्रकल्प मालकांसमोर आव्हानात्मक ठरत आहे.

सफाळ्याच्या पश्चिम भागात दातिवरे ते जलसार दरम्यान असलेल्या वेढी, टेम्भिखोडावे, डोंगर, खार्डी, विळंगी त्याचप्रमाणे केळवे- माहीम परिसरात तीनशे ते साडेतीनशे लहान मोठे कोळंबी प्रकल्प आहेत. हे प्रकल्प खाडी व समुद्र किनाऱ्या लगत खाजण व दुर्गम भागात असल्याने तसेच मोठ्या क्षेत्रफळावर विस्तारित असल्याने, अशा प्रकल्पांमधून रात्रीच्या वेळी देखील चोरी होत असते. कोळंबी प्रकल्पावर असलेल्या सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून एखाद्या कोळंबी तळ्यातील कोपऱ्यात खाद्यपदार्थ टाकून कोळंबीना एकत्रित कोपर्‍यात आणले जाते. या नंतर लहान जाळ्याच्या माध्यमातून कोळंबीना पकडल्या जात आहेत.

ताळेबंदीच्या या चोऱ्यांच्या प्रकारामंध्ये वाढ झाल्याचे प्रकल्प मालकांचे म्हणणे असुन, खाडी मार्गातून बोटी घेऊन ही मंडळी नियोजित पद्धतीने व तयारीने येतात. कोळंबी नाशवंतं असल्याने चोरलेल्या  कोळंबींना साठविण्यासाठी बर्फ देखील सोबत आणला जात असलयाचे निदर्शनास आले आहे. १० ते १५ जणांच्या टोळीमध्ये येणारी ही स्थानिक मंडळी काही प्रसंगी शस्त्र देखील सोबत आणत असलयाचे व प्रतिकार केल्यास दगडफेक करीत असलयाचे प्रकल्प मालकांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले आहे. चोरी करण्यासोबत तळ्यामधील पाण्यामध्ये अस्वच्छ जाळी व इतर सामुग्रीमुळे विषाणू पसरण्याची अधिक भीती असते. तसेच तळ्यातील कोळंबी कोपऱ्यात आकर्षित करण्यासाठी भात, शेण, मासळीचे तेल अशा वस्तूंचा वापर होत असलयाने, या मुळे प्रकल्पातील कोळंबींना  अन्य आजार होण्याची शक्यताही बळावत आहे.

येथील अधिक तर कोळंबी प्रकल्पांनी आपले उत्पादन (हार्वेस्टिंग) एप्रिल ते जून महिन्याच्या दरम्यान घेतले आहे. मात्र टाळेबंदीच्या अनुषंगाने या उत्पादन घेतलेल्या कोळंबीची विक्री करणे किंवा उत्पादन घेण्यासाठी अधिक प्रमाणात मनुष्यबळ आणणे हे कोळंबी प्रकल्प मालकांना शक्य नव्हते. त्याचा लाभ घेऊन काही गावातील ग्रामस्थांनी कोळंबी उत्पादन घेण्याच्यावेळी मोठ्या संख्येने धाडी टाकून दिवसाढवळ्या व प्रकल्पाचे मालक, व्यवस्थापकांच्या समक्ष कोळंबींची लूट केल्याचे प्रकार घडले आहेत.

याविषयी कोळंबी प्रकल्प मालकांनी महाराष्ट्र ऍक्वाकल्चर फार्मर्स अससोसिएशनच्या माध्यमातून स्थानिक पोलिस स्टेशनपासून थेट उपमुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रार नोंदवली आहे. मात्र, त्याचा विशेष फायदा झालेला नाही असे सांगण्यात येते.  मागील आठवड्यात झालेल्या अशाच एका प्रकारात उत्पादन (हार्वेस्टिंग) करायला आलेल्या एका तळ्यामधील 300 किलोपेक्षा अधिक कोळंबींची अनेक  ग्रामस्थांनी  चोरी करण्याचा प्रकार व्हिडिओमध्ये बंदिस्त झाला आहे. विशेष म्हणजे हा लुटीचा प्रकार समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय ठरला आहे.

हे ग्रामस्थ चोरलेल्या कोळंबीचा घरगुती खाण्यासाठी वापर करतात. तसेच,  रेल्वेसेवा सुरू असल्यास विरार- वसई व भाईंदर येथील मासळी बाजारमध्ये चोरलेली कोळंबी विक्रीसाठी नेली जात असल्याची माहिती पुढे आली आहे. या लुटीच्या प्रकारात मोठ्या संख्येने महिला देखील  सहभागी होत असल्याने, त्यांच्या टोळी समोर कोळंबी प्रकल्प मालक व व्यवस्थापन कर्मचारी देखील हतबल होत असल्याचे दिसून आले आहे.

या विषयी केळवा सागरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकरी राजू नरवडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सागरी पोलीस स्टेशनचे क्षेत्राची व्याप्ती व मनुष्यबळाची मर्यादा असलयाने अशा प्रकारांवर अंकुश ठेवणे कठीण होत असल्याचे सांगिलते. मोठ्या आणि मध्यम प्रकल्पधारकांनी प्रकल्पाच्या ठिकाणी आवश्यक रोषणाई व सुरक्षा व्यवस्था ठेवणे गरजेचे असल्याचेही सांगितले, या प्रकल्पनांमधून अधिकतर चोऱ्या खाडीमार्गातून होत असल्याचे देखील त्यांनी निदर्शनास आणून दिले.

निर्यात होणारी कोळंबी – 
१५-२० ग्रॅम वजनाची कोळंबी सध्या ३५० रुपये प्रति किलो, तर ५० ग्रॅम वजनाची कोळंबी ५५०-६०० रुपये किलो दराने सध्या मुंबईमध्ये विकली जात आहे. या भागातील अधिकतर उत्पादन निर्यात होत, असून त्यापोटी देशाला हजारो कोटी रूपांचे परकीय चलन देखील मिळत असते.