कुपोषणाचे प्रमाण देशात कमी होत आहे असे आपण म्हणत असलो तरीही महाराष्ट्रात मात्र आजही कुपोषणामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. ठाण्यातील पालघरमध्ये हे प्रमाण आजही तसेच आहे. नुकताच पालघमधील एका मुलीचा कुपोषणाने मृत्यू झाल्याने हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वाडा तालुक्यातील गुंज आदिवासी आश्रमशाळेतील ८ वी मध्ये शिकणाऱ्या प्रमिला शांताराम पागी हिचा मृत्यू झाला आहे. तब्येत बरी नसल्याने तिच्या शिक्षकांनी तिला रुग्णालयात दाखल केले, त्यावेळी ती कुपोषित असल्याचे लक्षात आले. प्रमिला हिचे हिमाग्लोबिन तपासले असता ते फक्त २ असल्याचे समोर आले आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. सामान्यपणे महिलांचे हिमोग्लोबिन १२ ते १४ असणे आवश्यक असते. मात्र ते खूपच कमी असल्याने तिच्यावर ही परिस्थिती ओढवली.

तिची परिस्थिती नाजूक असल्याने डॉक्टरांनी ठाणे रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला मात्ररुग्णालयात नेत असतानाच तिचा मृत्यू झाला. मागील चार महिन्यात आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूचा आकडा वाढत असून या कालावधीत ११९ जणांचे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हा बळी सरकारच्या अनास्थेचा बळी असल्याची टीका करत सरकार विशेषतः आदिवासी विकास विभागाच्या असंवेदनशीलतेचे हे जिवंत उदाहरण असल्याचे सांगत श्रमजीवी संघटनेचे संस्थापक माजी आमदार विवेक पंडित यांनी संताप व्यक्त केला आहे. आश्रमशाळेतील या मुलीचे हिमोग्लोबिन इतके कमी कसे झाले, येथील अन्नाचा दर्जा काय असेल, पुरेसे अन्न दिले जाते की नाही असे प्रश्न समोर आले आहेत.

ठाणे जिल्ह्यातील पालघर, तलासरी, जव्हार, विक्रमगड येथील परिस्थिती गंभीर असल्याचे आकडेवारीवरुन समोर आले आहे. बालमृत्यूप्रमाणेच याठिकाणी मातामृत्यूही मोठ्या प्रमाणात होतात. २०१५-१६ मध्ये ५६५, २०१६-१७ मध्ये ५५७, २०१७-१८ मध्ये ४६९ बालमृत्यूची नोंद झाली आहे. प्रसूतीच्या वेळी २०१४-१५ मध्ये १६, २०१५-१६ मध्ये १५, २०१६-१७ मध्ये १८, आणि २०१७-१८मध्ये १९ मातांचा मृत्यू झाल्याची माहिती उजेडात आली आहे. बालमृत्यू आणि मातामृत्यूचे प्रमाण डहाणू आणि जव्हार तालुक्यांत अधिक आहे. मोखाडा, पालघर, तलासरी, विक्रमगड आणि वाडा तालुक्यांतही मृत्यूचे प्रमाण लक्षणीय आहे.