सोलापूर-पुणे महामार्गावर शहराजवळ केगाव येथे मोटारसायकलची धडक बसून पादचारी व मोटारसायकलस्वार असे दोघेही मृत्युमुखी पडले. बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.
अजिंक्य शिवाजी मोहिते (रा. वैराग, ता. बार्शी) हे मोटारसायकल घेऊन मोहोळ येथून सोलापूरकडे येत होते. केगावजवळ देगाव फाटा येथे विनायक गोपाळराव रणसुभे (३०, रा. केगाव, सोलापूर) हे एका खासगी बसमधून उतरून रस्ता ओलांडत घराकडे पायी चालत जात असताना त्यांना मोटारसायकलने ठोकरले. यात गंभीर जखमी होऊन रणसुभे यांचा मृत्यू झाला, तर मोटारसायकलस्वार मोहिते यांचासुद्धा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला.
घराला आग लागून मृत्यू
शहरातील कोंतम चौकातील धाकटा राजवाडा या दलितवस्तीत राहणारे यल्लप्पा आप्पाशा गायकवाड (३२) या तरुणाचा स्वत:च्या घराला आग लागून घडलेल्या दुर्घटनेत मृत्यू झाला. मृत गायकवाड हे आजारी होते. ते घरातच आराम करीत असताना अचानकपणे विजेच्या शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागली. ही आग काही क्षणातच वाढत गेली. संपूर्ण घराला आगीने घेरले. यात गायकवाड यांचा होरपळून मृत्यू झाला. जेल रोड पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.