जिल्हा बँकेची निवडणूक पक्षविरहीत आणि बिनविरोध करण्यासाठी बुधवारनंतर अन्य पक्षांशी आपण चर्चा करणार असल्याचे आ. जयंत पाटील यांनी पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना सांगितले. दरम्यान, भाजपाचे आ. विलासराव जगताप यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांना आघाडीत घेण्यास विरोध केल्याने समविचारी लोकांना घेऊन मदानात उतरण्याची तयारी कदम गटाने सुरू केल्याने भाजपानेही स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू केली आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय आघाडी करण्यासाठी तासगाव पोटनिवडणुकीच्या निकालानंतरचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. सर्वपक्षीय आघाडी करण्यास राष्ट्रवादीने पुढाकार घेतला असला तरी याबाबत अद्याप बोलणीही सुरू झालेली नाहीत. २३ माजी संचालकांच्या पात्रतेबाबत उच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार असून त्यानंतर खऱ्या अर्थाने चर्चा सुरू होणार आहे. तासगाव पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अन्य पक्षांशी चर्चा करण्याची तयारी जयंत पाटील यांनी दर्शवली असून मोहनराव कदम यांच्याशीही चर्चा करणार आहेत.
भाजपाचे आ. जगताप यांनी कदम यांच्या सर्वपक्षीय पॅनेलमधील उमेदवारीला विरोध करीत असताना डॉ. पतंगराव कदम यांच्या नेतृत्वाखालीच सहकार अडचणीत आल्याची टीका केली आहे. त्यामुळे सर्वपक्षीय पॅनेल तयार होण्यापूर्वीच खीळ बसली आहे.
दरम्यान, भाजपानेही स्वतंत्र निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली असून सोमवारी सहकार तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत खासदार संजयकाका पाटील व जिल्ह्यातील भाजपाचे ४ आमदार यांची बठक होणार आहे. या बठकीत आघाडी करायची की स्वतंत्र निवडणूक लढवायची याचा विचार केला जाणार आहे. मदन पाटील यांनीही सर्वपक्षीय आघाडीत सामील होण्याबाबत अद्याप कोणतीच भूमिका घेतलेली नसली तरी पात्रतेबाबत नेमका काय निर्णय लागतो यावर दादा गटाचे धोरण अवलंबून राहणार आहे.