सोलापूर : राफेल खरेदी प्रकरणाची चौकशी दाबण्यासाठीच सीबीआयच्या संचालकांना हटविण्याचा मोदी सरकारचा निर्णय देशाला हुकूमशाहीकडे नेणारा आहे, अशा शब्दात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी टीकास्त्र सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘फेकॉलॉजी’ आता नवीन राहिली नाही. सोलापुरात हातमागावर विणलेले जॅकेट मिळतात, ही मोदींनी शिर्डीच्या कार्यक्रमात मारलेली थाप खासच आहे, अशी खिल्लीही त्यांनी उडविली.
सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कार्यकर्ता संवाद शिबीर शुक्रवारी सोलापूरजवळ बेलाटी येथे ब्रह्मदेव माने अभियांत्रिकी महाविद्यालयात पार पडले, त्या वेळी शिंदे बोलत होते. या वेळी पक्षाच्या राष्ट्रीय सचिवा सोनल पटेल (नवी दिल्ली) व पक्षाचे जिल्हा निरीक्षक मोहन जोशी यांच्यासह आमदार भारत भालके, आमदार सिध्दाराम म्हेत्रे, आमदार प्रणिती शिंदे, आमदार रामहरी रूपनवर, सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, निर्मला ठोकळ, प्रकाश यलगुलवार, पक्षाचे शहराध्यक्ष प्रकाश वाले व जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, की यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सत्ताकाळातही ‘इंडिया शायनिंग’च्या नावाखाली प्रसिध्दीचा झोत स्वत:वर टाकायचा प्रयत्न झाला होता. तेव्हा वैतागलेल्या जनतेनेच अटलजींच्या सरकारला नाकारले होते. आता मोदी सरकारच्या काळात देखील तशीच स्थिती आहे.
गेल्या चार-साडेचार वर्षांत देशात काँग्रेसच्या ताब्यात सत्ता नसल्यामुळे कदाचित पक्षात बेशिस्त आली आहे. कोणीही कशाही तऱ्हेने बोलण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळेच पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत कार्यकर्ता प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. हे प्रशिक्षण केवळ दिल्लीतून न देता ते देशभर जिल्हापातळीवर मिळण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. पक्षकार्यकर्ता एका शिस्तीच्या व्यवस्थेत यावा आणि त्यातून गांधीवाद, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या तत्त्वांचा अंगीकार व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.