सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राडा संस्कृती आणणाऱयांना त्याची किंमत लोकसभा निवडणुकीत निलेश राणे यांच्या पराभवाने चुकवावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दीपक केसरकर यांनी सोमवारी समर्थकांच्या बैठकीत दिला. त्याचबरोबर ज्यांना पाडायचंय त्यांच्या विरोधातलं बटण दाबा, असे सूचक वक्तव्यही त्यांनी यावेळी केले. कोणते बटण दाबणार असे विचारल्यावर बैठकीला उपस्थित असणाऱयांनी धनुष्यबाणाचे असे सांगत आपला कलही स्पष्ट केला.
राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या राजकारणाला विरोध करणारे केसरकर यांनी सावंतवाडीमध्ये आपल्या समर्थकांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी राणे यांच्या राजकारणावर जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणाला काळीमा फासण्याचे काम राणे यांनी केले. आज गडचिरोलीनंतर सर्वांत अशांत जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग ओळखला जातो. या जिल्ह्यातील वातावरण सतत पेटत ठेवण्याचे काम कोणी केले, हे सर्वांना माहिती आहे. कणकवलीमध्ये राडा संस्कृतीचे राजकारण कोणी आणले, हे सुद्धा सर्वांना माहिती आहे. आता ही राडा संस्कृती हद्दपार करण्याची वेळ आली आहे. कोणीतही या सर्वांविरोधात लढा दिला पाहिजे. सर्वसामान्य माणसाचे प्रतिक म्हणून मी हे काम करतो आहे. जर आत्ता मी राणेंना पाठिंबा दिला असता, तर मे महिन्यात मला कॅबिनेट मंत्रिपद मिळाले असते. मात्र, मला ते नकोय. मला तुमच्या सर्वांच्या आयुष्यात शांतता हवी आहे, असेही केसरकर यांनी सांगितले.