विधान परिषदेवर सदस्य नियुक्तीच्या वेळी मराठवाडय़ातील व्यक्तींना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी जाणीवपूर्वक डावलले. मराठवाडय़ावर असा सतत अन्याय होत असल्याने राज्याची काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त करावी व प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणी काँग्रेसचे माजी खासदार उत्तमसिंह पवार यांनी बुधवारी केली. लोकसभा निवडणुकीत बंडखोरी करू नये म्हणून पवार यांना विधान परिषदेचे गाजर दाखविण्यात आले होते. नव्याने नियुक्त्या झाल्यानंतर त्यांचे नाव नसल्याने ते चिडले आहेत. मराठवाडय़ातील एकाही व्यक्तीला प्रदेशाध्यक्ष ‘लायक’ समजत नाहीत, म्हणजे आम्ही नालायक आहोत का, असा सवालही त्यांनी पत्रकार बैठकीत केला.
मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे सर्व जण खोटे बोलतात. दिलेला शब्द पाळत नाही, असे सांगत मराठवाडय़ातील एकही माणूस विधान परिषदेवर नियुक्त न करणे अन्यायकारक असल्याचे पवार म्हणाले. नियुक्त केलेल्या सदस्यांपैकी सात जण पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. मुंबई व विदर्भातून प्रत्येकी तीन, उत्तर महाराष्ट्रातून एक व कोकणातून एका सदस्याला नियुक्ती देण्यात आली आहे. मराठवाडय़ातून एकही माणूस लायकीचा नव्हता का, असे पवार यांनी विचारले. प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्र्यांनी मराठवाडय़ावर नेहमीच अन्याय केला आहे. विकासाच्या सर्व क्षेत्रांत मराठवाडय़ाला डावलण्याचे राजकारण केले जात आहे. पाणी आणि अनुशेषाचे प्रश्न न सोडविल्याने आघाडी सरकारच्या विरोधात कमालीची नाराजी आहे. तरुण मंडळी तर नक्षलवादी बनेल की काय, असे वातावरण आहे. हे सरकार निजामापेक्षाही वाईट आहे, अशी टीका करत पवार यांनी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांना औरंगाबादमध्ये पाऊलही ठेवू देणार नाही, असे जाहीर केले. काँग्रेस पक्ष सोडणार नसल्याचे सांगत त्यांच्याकडून निलंबनाची नोटीस आल्यानंतर त्याला उत्तर देऊ, असे पवार यांनी सांगितले. तूर्तास पक्ष बदलणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
नाराज उत्तमसिंह पवार म्हणतात-
आघाडीचे सरकार निजामापेक्षा वाईट
मराठवाडय़ातील माणसे नालायक आहेत काय?
प्रदेशाध्यक्ष ठाकरे व महसूलमंत्री खोटे बोलतात.
काँग्रेस पक्ष सोडणार नाही.