सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत पावसाने निराशाच केल्यामुळे खरीप हंगाम वाया गेला असून, आता रब्बी हंगामही धोक्यात आल्याच्या पाश्र्वभूमीवर शेतीसाठी उजनी धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांनी जलसंपदामंत्र्यांकडे केली आहे.
दरम्यान, या मागणीनुसार उजनी धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्यास जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी संमती दिल्याचे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले. येत्या दोन दिवसांत उजनीतून पाणी सोडले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यासंदर्भात पालकमंत्री देशमुख यांनी मुंबईत जलसंपदामंत्री महाजन यांची भेट घेतली. या वेळी झालेल्या चच्रेत सोलापूर जिल्ह्यातील पावसाअभावी संकटात आलेल्या शेतीपिकांची गंभीर स्थिती जलसंपदामंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली गेली. उजनी धरणात सध्या वजा १० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. याप्रसंगी भाजपचे स्थानिक नेते शंकर वाघमारे, श्रीकांत देशमुख, रिपाइंचे राजा सरवदे, बाळासाहेब माळी आदी उपस्थित होते.