मुंबई : इयत्ता दुसरीच्या ‘बालभारती’च्या पुस्तकातील संख्यावाचनाच्या बदलाचे विधानसभेत बुधवारी पडसाद उमटले. या निर्णयास काँग्रेस आणि राष्ट्रवादीने विरोध केला. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, असा सवाल करीत या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होईल, असे मत अजित पवार यांनी सभागृहात व्यक्त केले.

बावीसऐवजी वीस दोन किंवा बेचाळीसऐवजी चाळीस दोन असे संख्यावाचन करण्याच्या दुसरीच्या पुस्तकातील बदलाचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले आहेत. अजित पवार यांनी विधानसभेत संख्यावाचन बदलण्याचा मुद्दा उपस्थित केला. ९८२२०९८२२० हा क्रमांक नवीन रचनेनुसार कसा लिहिणार, असा सवाल त्यांनी केला. नव्या संख्यावाचनानुसार दहा आकडी भ्रमणध्वनी क्रमांक १५ ते १६ आकडी होईल, असा टोला त्यांनी लगावला. संख्यावाचनाची नवी पद्धत आणल्याने विनोद तावडे यांच्याकडून शालेय शिक्षण खाते काढून ते आशीष शेलार यांच्याकडे सोपवले का, असा सवालही अजित पवार यांनी केला. विद्यार्थ्यांना सोपे शिकविण्याचे सोडून हे नवनवीन प्रयोग करून विद्यार्थ्यांचे नुकसान केले जात असल्याची टीकाही त्यांनी केली. संख्यावाचनाची ही नवीन पद्धत बदलावी, अशी मागणी त्यांनी केली.

महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या अंगवळणी पडले आहे ते बदलण्याचे काम ‘बालभारती’च्या माध्यमातून करण्याचे षड्यंत्र कोणाच्या इशाऱ्यावरून सुरू आहे, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. यामागे कोणती शक्ती आहे, हे स्पष्ट झाले पाहिजे. नव्या बदलास शिक्षण, साहित्य क्षेत्रातूनही विरोध झाला आहे. त्यामुळे सरकारने ही पद्धत बदलावी, अशी मागणी पाटील यांनी केली.

‘‘वीस दोन अशी संख्यावाचनाची क्लिष्ट पद्धत लागू करण्यामागे सत्ताबाह्य़ केंद्र असावे. या सत्ताबाह्य़ केंद्राचा अजेंडा राबविण्याचे काम केंद्र व राज्यात सुरू आहे. कोणाची मागणी नसताना हा बदल करण्यामागे कारण काय’’, असा सवाल काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. विद्यार्थ्यांचे नुकसान होईल असे शिक्षण दिले जात असल्याची टीकाही त्यांनी केली. संख्यावाचनात बदल करणारे इयत्ता दुसरीचे पुस्तक रद्द करण्यात यावे, अशी मागणी वडेट्टीवार आणि शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केली. विद्यार्थ्यांना जोडाक्षरे वाचता आलीच पाहिजेत, असे मतही आमदार पाटील यांनी व्यक्त केले. विधान परिषदेत या वादग्रस्त मुद्दय़ावर चर्चेची मागणी पाटील यांनी केली आहे.