नुकसान एक कोटीचे मदत १७ लाखांची; सात हजार मच्छीमार मदतीच्या प्रतीक्षेत

हर्षद कशाळकर

निसर्ग चक्रीवादळाने मच्छीमारांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र महिन्याभरानंतरही मच्छीमार शासकीय मदतीपासून वंचित आहेत. मच्छीमारांचे जवळपास एक कोटी रुपयांचे नुकसान झाले असताना शासनाकडून १७ लाख ८१ हजार रुपयांचा निधी आला आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील सात हजार मच्छीमार अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

जिल्ह्य़ातील सात हजार १२६ मच्छीमार बोटींना निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला. सात हजार ९६ बोटींचे अंशत: तर ३० होडय़ांचे पूर्णत: नुकसान झाले. याशिवाय ६१ जाळ्यांचे अंशत: तर ८ जाळ्यांचे पूर्णत: नुकसान झाले. १२ हेक्टरवरील मत्स्यशेतीचे वादळात नुकसान झाले. वादळी पावसाने मत्स्य खाद्य नष्ट झालेय, तर अनेक ठिकाणी शेततळ्यांची बंदिस्ती फुटण्याच्या घटना घडल्या आहेत.  मत्स्य विभागाने पंचनाम्याची कामे पूर्ण केली आहेत. यात ९६ लाख ६० हजार ३६४ रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

जुन्या निकषांनुसार अंशत: नुकसान झालेल्या बोटीला चार हजार रुपये तर पूर्णत: नुकसान झालेल्या होडीला नऊ हजार रुपये मदत दिली जात होती. तर जाळीच्या नुकसानीसाठी दोन हजार ६०० रुपयांची मदत दिली जात होती. राज्य सरकारच्या नवीन निकषांनुसार आता अंशत: नुकसान झालेल्या होडीला १० हजार रुपये तर पूर्णत: नुकसान झालेल्या बोटींना २५ हजार रुपये मदत दिली जाणार आहे, तर जाळ्यांसाठी पाच हजार एवढी मदत दिली जाणार आहे. मात्र शासनाकडून मच्छीमारांना वाटपासाठी पुरेसा निधीच उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे महिन्याभरानंतरही मच्छीमारांना मदतच मिळू शकलेली नाही.

वादळामुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने मदत देण्याची घोषणा केली आहे. पण प्रत्यक्षात मदत पोहोचली नाही. मुरुड तालुक्यात १९७ बोटींचे नुकसान झाले. मात्र तालुक्याला सहा  लाख ११ हजार प्राप्त झाले ते अपुरे आहेत.

–  मनोहर बैले, उपाध्यक्ष, रायगड जिल्हा मच्छीमार संघ

मच्छीमारांना आत्तापर्यंत १७ लाख ८१ हजार रुपयांची मदत वाटप करण्यात आली आहे. वाढीव निधी मिळण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. लवकरच उर्वरित रक्कम प्राप्त होईल.

– निधी चौधरी, जिल्हाधिकारी रायगड

मच्छीमारांना वाढीव मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तो निधी मिळेलच. पण या संपुर्ण हंगामात तीन लहान-मोठी वादळे, अवकाळी पाऊस यामुळे मच्छीमारांचे जास्त नुकसान झाले आहे. त्यामुळे मच्छीमारांना वेगळे पॅकेज दिले जावे यासाठी मी प्रयत्न करणार आहे.

– सुनील तटकरे, खासदार