तलाठीही जखमी

यवतमाळ :  अवैध वाळू वाहतुकीवर आळा घालण्यास गेलेल्या नायब तहसीलदारांसह तलाठय़ावर वाळू तस्करांनी जीवघेणा हल्ला केला. ही घटना उमरखेड तालुक्यात घडली. या घटनेमुळे महसूल प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली असून वाळू तस्कर प्रशासनावर हावी होत असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांत रोष व्यक्त होत आहे.

या हल्लय़ात उमरखेडचे नायब तहसीलदार वैभव पवार आणि तलाठी गजानन सुरोशे हे जखमी झाले. नायब तहसीलदार पवार हे आपले सहकारी तलाठी सुरोशे यांच्यासह शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास उमरखेड ते ढाणकी मार्गावर होत असलेल्या वाळू तस्करीच्या शोधमोहिमेवर गेले होते. यावेळी काही वाहनांद्वारे वाळू तस्करी सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी या तस्करांना हा प्रकार थांबवण्याचे सांगून वाहने प्रशासनाच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले. त्यामुळे वाळू तस्करांनी शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून त्यांना शिवीगाळ करीत हल्ला केला. आरोपी अविनाश चव्हाण व त्याच्या इतर साथीदारांनी वैभव पवार यांच्या पोटावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. तसचे तलाठी सुरोशे यांनाही मारहाण करून हल्ला केला. दोन्ही जखमींना घटनास्थळी सोडून तस्कर हल्लेखोर पसार झाले. अधिकाऱ्यांनी ही माहिती आपल्या सहकाऱ्यांना कळवली. त्यानंतर उमरखेड महसूल विभागातील अधिकारी, उमरखेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या हल्लय़ात वैभव पवार गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर तत्काळ उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारकरिता त्यांना नांदेड येथे पाठवण्यात आले.

या घटनेची गंभीर दखल जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी घेतली असून आरोपी अविनाश चव्हाण व त्याच्या इतर साथीदारांवर कडक कलम लावून तत्काळ कारवाई करण्याचे आदेश उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह उमरखेडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. नायब तहसीलदार आणि तलाठी यांची प्रकृती ठीक असून त्यांना जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण मदत केली जाईल, असेही जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे.

जिल्ह्यतील वाळूघाटांच्या लिलावाची प्रक्रिया नुकतीच सुरू झाली आहे. जिल्ह्यत काही घाटांचे लिलाव झाले आहेत. मात्र बहुतांश घाट बंद असल्याने वाळूची अवैध तस्करी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. यामुळे प्रशासनाचा महसूल बुडत आहे. जिल्ह्यत सर्वत्र वाळू माफियांना राजकीय व प्रशासकीय अभय असल्यानेच वाळू माफियांची हिंमत वाढल्याची चर्चा जिल्ह्यत आहे. पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी वाळू माफियांना आवर घालण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.