तीन वर्षांनतर किल्ल्याच्या संवर्धनासाठी शासकीय निधी

हर्षद कशाळकर, अलिबाग

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत किल्ले रायगडसाठी २० कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास तीन वर्षांनंतर किल्ल्याच्या संवर्धनासाठी शासनाकडून निधी प्राप्त होणार आहे, असे असले तरी, तांत्रिक अडचणी आणि आजवर झालेल्या कामांचा अनुभव लक्षात घेता रायगड किल्ला संवर्धनाच्या कामाला गती मिळेल की नाही, याबाबत साशंकता आहे.

रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी ६०६ कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारने तयार केला. या आराखडय़ाला २०१६ मध्ये मंजुरी देण्यात आली. मात्र प्रत्यक्ष निधी प्राप्त होण्यास २०१७ साल उजाडले. पहिल्या टप्प्यातील कामांसाठी ५९ कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्यात आला. मात्र निधी प्राप्त झाल्यावरही जवळपास वर्षभर प्रत्यक्ष कामांना सुरुवात होऊ  शकली नाही. पुरातत्त्व विभागाकडून प्रस्तावित कामांना मान्यता मिळण्यात होणारी दिरंगाई यास कारणीभूत ठरली. त्यामुळे आराखडय़ाला मंजुरी मिळाल्यानंतर जवळपास २ वर्षांनी प्रत्यक्ष कामांना सुरुवात झाली.

पहिल्या टप्प्यात या कामासाठी ५९ कोटींचा निधी प्राप्त झाला. यातील दहा कोटी भूसंपादनासाठी, तर ९ कोटी किल्ल्यावरील पायवाटा व इतर कामांसाठी वापरण्यात आले. ४० कोटी रुपये किल्ला संवर्धन व इतर पर्यटन सुविधांसाठी वापरले जाणार आहेत. यासाठी स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना करण्यात आली असून, पुरातत्त्व विभाग आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून ही कामे केली जाणार आहेत.

आराखडय़ात समाविष्ट कामे

’ किल्ल्यांचा इतिहास जिवंत करून दाखविण्यासाठी शिवसृष्टी तयार करणे, रायगड किल्ल्यावर प्राचीन वास्तूंचे संवर्धन, शास्त्रयुक्त पद्धतीने डेब्रिज काढणे व उत्खननातील प्राचीन इमारतीचे संवर्धन करणे, गडावर विविध ठिकाणी आधुनिक पद्धतीची स्वच्छतागृहे बांधणे, घनकचरा व्यवस्थापन, रायगड किल्ल्यावरील सर्व वस्तूंचे डॉक्युमेन्टेशन, हद्दीचे सीमांकन आदी कामांचा समावेश या आराखडय़ात करण्यात आला आहे.

’ त्याचप्रमाणे रायगड किल्ल्यावरील चित्ता दरवाजा, नाना दरवाजा, खुबल्डा बुरूज, महा दरावाजा आदींचे संवर्धन व जीर्णोद्धार करणे. तसेच, पर्यटक व शिवप्रेमींना रायगडावर पोहोचण्यासाठी मजबूत पायवाटा निर्माण करणे, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी आदी महत्त्वाच्या सोयी उपलब्ध करून देणे, जलसंवर्धन करणे. याशिवाय पाचाड येथील राजमाता जिजाऊ  समाधी व जिजामाता वाडा यांच्या संवर्धन व जीर्णोद्धार, तसेच या ठिकाणी पर्यटकांसाठी आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

पूर्ण झालेली कामे

किल्ल्यावर आत्तापर्यंत रोप वे, होळीचा माळ परसबंदी (पायवाट), रोप वेच्या शेजारी तीन वाडय़ांचे पुरातत्त्वीय उत्खनन, चित्ता दरवाजा ते होळीच्या माळापर्यंतच्या पायऱ्या, नाणे दरवाजा ते महा दरवाजा पायवाट सुधारणा, नाणे दरवाजा बांधकाम ही कामे पूर्ण झाली आहेत. पुरातन वास्तूंचे संवर्धन, हत्ती तलावाची दुरुस्ती ही कामे मार्गी लागली आहेत. मात्र अद्याप अनेक कामे अपूर्ण आहेत. आता दुसऱ्या टप्प्यात २० कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त होणार आहे. मात्र मागील अनुभव लक्षात घेता, किल्ला संवर्धनाच्या कामांची गती वाढवावी, अशी मागणी शिवप्रेमींकडून केली जात आहे.

भौगोलिक आणि नैसर्गिक परिस्थितीमुळे किल्ल्याच्या संवर्धनात तांत्रिक अडचणी येत आहेत. पावसाळ्यातील चार ते पाच महिने संवर्धनाचे काम जवळपास बंद असते. त्यामुळे संवर्धनाच्या कामाला अपेक्षित गती मिळू शकली नाही. पण आता या कामांना सुरुवात झाली असून, येत्या चार महिन्यांत किल्ला संवर्धनाची बरीच कामे मार्गी लागतील.

– रघुजीराजे आंग्रे, सदस्य, रायगड प्राधिकरण