जनतेने आम्हाला जनमत दिलं होतं, मात्र शिवसेनेने बेईमानी केली अशी टीका माजी मुख्यमंंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पालघरमध्ये झालेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली. वर्गात पहिला आलेल्या मुलाला बाहेर बसवण्यात आलं असाही टोला फडणवीस यांनी लगावला. एवढंच नाही तर ठाकरे सरकारवरही त्यांनी टीका केली.  शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफीची घोषणा देणार होती मात्र ते आश्वासन ठाकरे सरकारनं पाळलं नाही अशीही टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

“सत्तेसाठी शिवसेना या थराला जाईल असं वाटलं नव्हतं. बाळासाहेब ठाकरे यांना शब्द दिला होता की मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात रान पेटवलं, कायम त्यांच्यावर टीका केली. त्या बाळासाहेब ठाकरेंना काय वाटत असेल याची कल्पनाच केलेली बरी.  काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जिवावर शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असा शब्द दिला होता का? असाही प्रश्न फडणवीस यांनी विचारला. सरसकट कर्जमाफी, सातबारा कोरा करु, विनाअट कर्जमाफी अशा घोषणा तर देण्यात आल्या होत्या मात्र त्या घोषणा हवेत विरल्या. सत्तेवर असलेल्या तीन पक्षांनी फक्त जनादेशाशी प्रतारणा केली नाही तर शेतकऱ्यांशी आणि जनतेशी प्रतारणा केली” अशीही टीका फडणवीस यांनी केली.

शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली आणि स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. आम्ही आमच्या जाहीरनाम्यात असं कुठेही सांगितलं नव्हतं की कर्जमाफी देऊ तरीही आम्ही कर्जमाफी दिली आणि हे सरकार शब्द देऊनही तो फिरवतं आहे असंही फडणवीस म्हणाले. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा केली होती, मात्र तो शब्दही या सरकारने पाळला नाही.