करोना प्रादुर्भाव झाल्यापासून राज्यात आतापर्यंतचा सर्वाधिक संसर्गाचा मासिक दर सप्टेंबर महिन्यात आढळून आला असून त्यात जवळजवळ चार टक्क्यांनी वाढ झाली आहे. असे असले तरी हव्या त्या प्रमाणात चाचण्यांच्या संख्येत वाढ केली जात नाही. आता अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्याचे आव्हान असताना आणि पाच महिन्यांचा कालखंड चाचण्या न वाढविण्यात निघून गेला असताना पुन्हा एकदा चाचण्यांवर लक्ष केंद्रीत करण्याची विनंती माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रातून केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की “चाचण्या वाढविण्यासंदर्भात सातत्याने पत्रव्यवहार करीत असतानाही पाहिजे त्या प्रमाणात चाचण्या वाढविण्यात आलेल्या नाहीत. परिणामी संसर्ग कमी होणे सोडून तो अधिकाधिक वाढत आहे. सप्टेंबर २०२० मध्ये आतापर्यंतच्या सहा महिन्यांतील सर्वाधिक संसर्गाचा दर महाराष्ट्रात आढळून आला आहे. ऑगस्ट महिन्यात राज्यात चाचण्यांची संख्या ४२ टक्क्यांनी वाढविल्यानंतर ती आणखी वाढविण्याची गरज होती. पण, सप्टेंबरमध्ये ऑगस्टच्या तुलनेत केवळ २६ टक्के अधिक चाचण्या करण्यात आल्या. जुलैमध्ये प्रतिदिन ३७ हजार ५२८ ऑगस्टमध्ये प्रतिदिन ६४ हजार ८०१  तर सप्टेंबरमध्ये प्रतिदिन ८८ हजार २०९ चाचण्या करण्यात आल्या.”

केंद्र सरकारकडून सुद्धा चाचण्या वाढविण्यासंबंधी वारंवार सूचना दिल्या जात आहेत. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, मा. पंतप्रधान महोदयांसोबतच्या व्हीडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये आपण चाचण्यांची संख्या दीड लाखांपर्यंत वाढविण्याचा विचार बोलून दाखविला. तरीसुद्धा प्रत्यक्षात मात्र दिवसागणिक चाचण्या कमी होत असल्याचे दिसून येते.

राज्यातील प्रत्येक महिन्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे. एप्रिल (८.४ टक्के), मे (१८.७ टक्के), जून ( २१.२३ टक्के), जुलै (२१.२६ टक्के), ऑगस्ट (१८.४४ टक्के), सप्टेंबर (२२.३७ टक्के). चाचण्या वाढविण्याचा परिणाम सुद्धा आपल्यासमोर आहे. ऑगस्टमध्ये ४२ टक्के चाचण्या वाढविल्यावर संसर्गाचे प्रमाण २१ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आले होते. ते सप्टेंबरमध्ये चार टक्क्यांनी वाढून आता २२.३७ टक्के इतके झाले आहे. या एकट्या महिन्यात १२,०७९ लोकांना करोनामुळे प्राणास मुकावे लागले. आतापर्यंतच्या कोणत्याही महिन्यांपेक्षा ही संख्या सर्वाधिक आहे.

एकिकडे राज्यात थोड्या तरी अधिक संख्येने चाचण्या केल्या जात आहेत. पण, मुंबईत तर स्थिती आणखी भीषण आहे. मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल आणि देशाच्या आर्थिक राजधानीचे चक्र पुन्हा कार्यरत करायचे असेल तर मुंबईसारख्या लोकसंख्येतील चाचण्यांचे प्रमाण कितीतरी अधिक असायला हवे. सप्टेंबर महिन्यात दररोज सरासरी केवळ ११ हजार १७५  चाचण्या करण्यात आल्या आहेत. परिणाम काय झाला? ऑगस्टमध्ये मुंबईचा संसर्ग दर जो  १३.६३ टक्के होता, तो सप्टेंबरमध्ये पुन्हा १७.५० टक्क्यांवर  येऊन ठेपला आहे. याचाच अर्थ चार टक्क्यांनी संसर्ग दर वाढला आहे. जुलै महिन्यात सुद्धा असाच १७.९७ टक्के संसर्ग दर होता. दिल्लीतील दैनंदिन सरासरी चाचण्या आता ४० हजारांच्या वर नेण्यात आल्या आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रात म्हटले आहे.

मुंबईला अनेक उपनगरं जोडली आहेत. मुंबईतून कोकणात सुद्धा लोकांचे आवागमन मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे तेथे सुद्धा कमी चाचण्यांमुळे प्रादुर्भावाचा फटका बसतो आहे. मुंबईसह ज्या ज्या भागात कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे, तेथे चाचण्यांच्या संख्येत मोठी वाढ त्वरित करण्यात यावी. चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी वाया जाणारा प्रत्येक दिवस हा भविष्यात आणखी मोठ्या समस्यांना आमंत्रण देणारा ठरेल, हे लक्षात घेणे अतिशय आवश्यक आहे. आपण त्यावर कारवाई कराल, अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.