जलयुक्त शिवारच्या यशानंतर राज्यात लवकरच ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ हा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मूल येथे केली. आघाडी सरकारच्या काळात शिक्षणात १८व्या स्थानी असलेला महाराष्ट्र भाजपची सत्ता येताच तीन वर्षांत देशात तिसऱ्या क्रमांकावर आला असून लवकरच प्रथमस्थानी पोहोचेल, कमी पावसाने या भागात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याचीही भरपाई शासन करेल आणि गोसेखुर्दचे पाणी लवकरच पोंभूर्णापर्यंत पोहोचेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मूल येथील कै. रावसाहेब फडणवीस स्मृती स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त संस्थेच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर दुग्धव्यवसाय, पशुसंवर्धन, मत्ससंवर्धन मंत्री महादेव जानकर, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, आमदार कीर्तीकुमार भांगडिया, मूलच्या नगराध्यक्षा रत्नमाला भोयर, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शोभा फडणवीस, मूलचे उपाध्यक्ष नंदू रणदिवे उपस्थित होते. शाळेच्या रौप्यमहोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी मुख्यमंत्री फडणवीस व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले.

यावेळी यश टिंगुजले, चेतना निकोडे, पायल वाळके या गुणवंत विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांचे आजोबा रावसाहेब फडणवीस स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विविध स्पर्धामधील व गुणवत्तेत आलेल्यांचाही सत्कार करण्यात आला. या शिक्षण संस्थेच्या विस्तार व विकासासाठी राज्य शासनातर्फे ५० लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.

शोभा फडणवीस यांनी यावेळी काही मागण्या मांडल्या होत्या. त्यांचा उल्लेख करीत त्यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यासंदर्भात सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानंतर आवश्यक मदत पूर्ण केली जाईल. जिल्हय़ातील सात तालुक्यांत गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी पोहोचले आहे. आता हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने काम करायला सुरुवात करणार असून जिल्हय़ातील उर्वरित भागात जिथे शक्य असेल त्या ठिकाणी हे पाणी पोहोचवण्यासाठी संबंधित विभागाची बैठक घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात धरणातील गाळ काढून शिवार सुपीक करण्याची योजना सुरू आहे. चंद्रपूर जिल्हय़ातील शाश्वत जलसाठय़ात वाढ करण्यासाठी येथील तलावाचे खोलीकरण केले जाईल. जिल्हय़ातील अर्धवट राहिलेले सिंचन प्रश्नाबाबत सकारात्मक विचार केला जाईल.

यावेळी जिल्हय़ाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार स्वास्थ नसल्यामुळे येऊ शकले नाही. त्यांच्या तसेच शिक्षण मंत्री विनोद तावाडे यांच्याकडूनही विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. तत्पूवी संस्थेच्या अध्यक्ष शोभा फडणवीस यांनी भाषणात पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी या विद्यालयासाठी मदत केली याबद्दल आभार मानले. पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्सव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी वंचितांसाठी या शाळेच्या माध्यमातून सुरू असलेल्या ज्ञानदानबद्दल शोभा  फडणविसांचे आभार मानले.

मदर डेअरीच्या माध्यमातून या भागात विकास केला जाईल, असे स्पष्ट केले. गरीब, वंचिताच्या मुलांना ही शाळा प्रोत्साहन देत असल्याबद्दल कौतुक करताना २५ लाख रुपये अधिक देण्याची घोषणा केली. कार्यक्रमाचे संचालन शशिकांत धर्माधिकारी यांनी केले. यावेळी मोतीलाल टेहलानी, नंदू रणदिवे, अविनाश जगताप, गजानन वल्केवार, दिलीप सूचक, अशोक गंधेवार, मुख्याधापक संतोष खोब्रागडे, देवराव पटेल यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

मदत नैतिकदृष्टय़ा योग्य आहे का?

राज्यातील शेतक ऱ्यांची अवस्था अत्यंत नाजूक असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी त्यांच्या काकूच्या संस्थेला ५० लाखांची सरकारी मदत जाहीर केली, हे कायदेशीरदृष्टय़ा योग्य असले तरी नैतिकदृष्टय़ा योग्य आहे का? अशी चर्चा या भागातील धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आहे.