आणीबाणीच्या काळात संघातील ज्या लोकांना तुरुंगवास झाला होता त्या लोकांना भाजप सरकारने दहा हजार रुपये महिना जाहीर केले आहे आणि माझ्या शेतकऱ्यांना पाचशे रुपये महिना दिले आहेत. ही शेतकऱ्यांची चेष्टा नाही का ?असा संतप्त सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. पाथर्डीच्या जाहीर सभेत बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब पाथर्डीला मावशी म्हणायचे आणि माझ्या नात्यानुसार ही पाथर्डी माझी आजी आहे असं यावेळी ते म्हणाले. ‘आज बजेट सादर झाला आहे. ज्यापद्धतीने १४ साली घोषणा केल्या होत्या त्याचपद्धतीने या बजेटमध्येही भल्यामोठ्या घोषणा आहेत. आता या बजेटच्या आधारावर मोठमोठी भाषणे केली जातील पण लक्षात ठेवा इस धारावाहीक की सारी कथाऐ काल्पनिक है’, असा टोला धनंजय मुंडेंनी लगावला.

आज माझा शेतकरी अडचणीत आहे परंतु सरकार दुष्काळ गांभीर्याने घेत नाही असेही धनंजय मुंडे म्हणाले. पाथर्डी भागात एक काळ असा होता की भगवान गडावरून मुंडे साहेबांनी एक भाषण केले होते आणि धनंजय मुंडे त्यावेळी खलनायक चित्रपटाचा संजय दत्त झाला होता. मात्र त्याच पाथर्डीने आज माझे स्वागत केले असं त्यांनी सांगितलं.

आमच्या लोकनेत्याचे अपघाती निधन झाले. सांगण्यात आले की कार अपघात होता मग कोणत्या ड्रायव्हरला शिक्षा झाली आणि कोणत्या कोर्टात झाली ते स्पष्ट झाले पाहिजे. मुंडे साहेबांचा राजकीय वारस सांगणाऱ्यांनी देखील निधन झाले त्यावेळी ट्विट करून संशय व्यक्त केला होता. मग ते ट्विट दोन मिनिटात का डिलीट केले असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला.

इथे भाजपचा खासदार आहे त्याने या भागासाठी काय केले ? असा सवाल करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसवर तुम्ही विश्वास टाका जेवढा जीव मुंडे साहेबांनी या पाथर्डीला लावला तेवढा मी लावण्याचा प्रयत्न करेन असे आश्वासन धनंजय मुंडे यांनी दिले.