सत्तेचा दुरुपयोग करुन जामनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जातो आहे. दात तुटेपर्यंत कार्यकर्त्यांना मारले जाते आहे. लक्षात ठेवा आम्ही सत्तेत येऊ तेव्हा तुम्हाला पळता भुई थोडी होईल. आता तुमचे थोडेच दिवस उरले आहेत. मग बघा तुमचं कसं होईल. चुन चुनके… असं म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शोले सिनेमातल्या धर्मेंद्र स्टाईल इशारा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तना यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातील जामनेर येथील भाषणात धनंजय मुंडेंनी सरकारवर टीकेचे ताशेरे झाडले.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नुकतीच बारामती जिंकण्याची भाषा केली त्यांचा समाचार घेतांना धनंजय मुंडे म्हणाले की , काही लोक बारामती जिंकून दाखवेन म्हणतात , यांना बारामतीच्या नखाची तरी सर आहे का? जामनेरचे एक गाव तरी आदर्श करून दाखववा. अहो, जामनेरकरांना साधं पिण्याचं पाणी सुद्धा देऊ शकत नाही तुम्ही. काहीही करा पण बारामतीचा नाद करू नका असाही इशारा मुंडे यांनी दिला.

जामनेर नगरपालिकेचा निकाल खरंतर लोकशाहीची हार होती. ती लढाई होती धनशक्ती विरोधात जनशक्तीची. पैसा, लागेल त्याला पैसे व इव्हीएम घोटाळा हे समीकरण जुळलं होतं. झोळ्यात पैसे जमा करणाऱ्या पक्षाच्या इथल्या मंत्र्यांकडे एका मताला हजारो रूपये मोजण्याची ऐपत कुठून आली? असा सवाल उपस्थित केला.

या सभेला विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील, माजी अध्यक्ष अरुण भाई गुजराथी राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष इश्वर बाळबुधे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, संजय गरुड, रविंद्र पाटील, संतोष चौधरी व पदाधिकारी उपस्थित होते.