वसंत मुंडे

राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित मंत्री धनंजय मुंडे यांनी अवघ्या दोन दिवसात तीन पक्षांची मोट बांधून बहुमताजवळ असलेल्या भाजपकडून जिल्हा परिषदेची सत्ता खेचून घेतली. ऐनवेळी शिवसेनेला सोबत घेत भाजपचेच तीन सदस्य फोडून तीन वषार्ंपूर्वीच्या फोडाफोडीचा डाव उलटवल्याने पंकजा मुंडे यांची राजकीय ‘जादूची कांडी’ निष्प्रभ ठरली. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यापासून, बहुमत नसताना सत्ता मिळवण्याची बहुचíचत  ‘जादूची कांडी’ आता धनंजय मुंडे यांच्या हाती आल्याचे मानले जात आहे.

बीड जिल्हा परिषदेत भाजप-शिवसेना आणि इतर पक्षाचे काही सदस्य तीन वर्षांपासून बरोबर असल्याने या वेळीही भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने सत्ता कायम राहणार असा दावा होता. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनीही १५ दिवसांपूर्वी सर्व सदस्यांची बठक घेऊन व्यूहरचना करत राज्यात सत्तांतर झाले तरी जिल्हा परिषदेची सत्ता कायम ठेवण्यासाठी सर्व सदस्य सुरक्षित स्थळी हलवले होते. ६० सदस्य संख्येत पाच सदस्यांना अपात्र ठरवण्यात आल्याने आणि दोन जागा रिक्त असल्याने ५३ सदस्यसंख्येत बहुमतासाठी २७ चा आकडा आवश्यक होता. पण भाजपकडून तब्बल ३० सदस्य सहलीवर असल्याचा दावा केला असल्याने राष्ट्रवादीचे नेतेही फारशी हालचाल करताना दिसत नव्हते.

शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या चार सदस्यांवरच भाजपची मदार होती. दरम्यान राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर राष्ट्रवादी नेत्यांच्या अपेक्षा वाढल्या. धनंजय मुंडे यांनीही अवघ्या दोन दिवसात आपले राजकीय कौशल्य पणाला लावत बहुमताच्या जवळ असलेल्या भाजपचेच तीन सदस्य फोडून काँग्रेसचे सदस्य राजेसाहेब देशमुख यांची घरवापसी करून शिवसेनेचेही महत्त्व कमी केले. परिणामी राज्यात शिवसेना महाविकास आघाडीत असल्याने शिवसेनेनेही राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा निर्णय वरिष्ठांच्या आदेशानुसार घेतला. शनिवारी धनंजय यांनी चार तास तळ ठोकून शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या तीन पक्षांच्या नेत्यांची मोट बांधून भाजपच्या तीन सदस्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादीचे २३चे संख्याबळ ३२वर नेले.

राष्ट्रवादीच्या घाटनांदूर गटातील शिवकन्या शिवाजी शिरसाट यांना अध्यक्ष, तर बजरंग सोनवणे यांना उपाध्यक्ष करून जिल्हा परिषदेतील सत्ता ताब्यात घेतली. भाजपकडे केवळ २१ मते राहिली. तीन वषार्ंपूर्वी बहुमत नसताना राष्ट्रवादी फोडून सत्ता मिळवण्याचा फोडाफोडीचा डाव या वेळी भाजपवरच उलटवला. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनीही जिल्हा परिषदेत अनेक वेळा बहुमत नसताना काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांना फोडून सत्ता मिळवण्याचे डाव यशस्वी केल्याने दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची ‘जादूची कांडी’ प्रसिद्ध होती.

पाच वर्षांपूर्वी सत्तेची सूत्रे पंकजा मुंडे यांच्याकडे आल्यानंतर त्यांनीही सुरुवातीला जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे सदस्य फोडून सत्ता मिळवली. लातूर-बीड-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही राष्ट्रवादीच्या उमेदवारालाच माघार घ्यायला लावून सुरेश धस यांना विजयी केले. जिल्ह्यतील राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना सोबत घेतल्याने दिवंगत मुंडे यांची ‘जादूची कांडी’ आपल्याकडे असल्याचा दावा अनेकदा जाहीरपणे केला होता. मात्र,  विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून या वेळी धनंजय मुंडे यांनी पंकजा यांचा दारुण पराभव केला. राज्यातही सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन धनंजय मुंडे यांच्याकडे सत्तेची सूत्रे आली.