मंत्रालयात विष प्राशन केलेले वयोवृध्द शेतकरी धर्मा मांगा पाटील (८०) यांचे रविवारी रात्री मुंबईतील जे. जे. रुग्णालयात निधन झाल्याचे तीव्र पडसाद धुळ्यासह राज्यभरात उमटले. मयत शेतकऱ्याच्या मुलाने जे. जे. रुग्णालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले तर विखरणच्या शेतकऱ्यांनी रोष प्रगट केला. ज्या कारणाने पाटील यांनी इतका टोकाचा निर्णय घेतला, त्या भू संपादनात राजकीय नेते, शासकीय अधिकारी, दलालांनी सावळा गोंधळ घातल्याचे उघड होत आहे. शेजारील शेतकऱ्याच्या दोन एकर शेतीला सुमारे दोन कोटींचा मोबदला, तर पाच एकरवर आंबे पिकविणाऱ्या पाटील यांना अवघ्या काही लाखांचा मोबदला प्रशासनाने दिला होता. पाटील यांच्या आत्महत्येने आता कारवाईच्या भीतीने धुळे जिल्हा प्रशासकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. शिंदखेडा तालुक्यात ‘महाजनको’च्यावतीने प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने विखरणचे शेतकरी धर्मा पाटील अखेपर्यंत सर्वाकडे दाद मागत होते. धर्मा पाटील यांच्या मृत्यूची बातमी कळताच विखरणच्या ग्रामस्थांनी दोंडाईचा- धुळे रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन  केले. आंदोलनामुळे धुळे-दोंडाईचा मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली.पाटील यांच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. काँग्रेसच्यावतीने धुळे-नंदुरबार रस्त्यावर आंदोलन झाले.

धर्मा पाटील यांची आत्महत्या धुळे जिल्ह्यातील भूमाफिया, दलालांनी घातलेल्या गोंधळाचा परिणाम आहे. मागील वर्षी पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन झालेल्या अन्यायाबाबत दाद मागितली होती. त्याची प्रशासनाने गांभिर्याने दखल नसल्याचा आरोप भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.

मूल्यांकनात दुजाभाव

प्रकल्पासाठी ६०० हेक्टर जमिनीपैकी ४०० हेक्टर जमिनीची खरेदी करण्यात आली आहे. मोबदला देताना जिल्हा प्रशासनाने पक्षपातीपणा केल्याचा आक्षेप आहे. पाटील यांच्या पाच एकर शेतात आंब्याची ६०० झाडे होती. विहिर, ठिबक सिंचन होते. त्याचे मूल्यांकन न करता जमिनीसाठी चार लाख १५ हजार रुपयांचा मोबदला दिला गेला. पाटील यांच्या शेतालगतच्या दोन एकर डाळिंबाच्या शेतासाठी हा मोबदला एक कोटी ९० लाख रुपये दिला गेला. मूल्यांकनात दुजाभाव का, यासाठी पाटील पाठपुरावा करीत होते. पाटील यांच्या शेतजमीन संपादनावेळी तलाठी आणि कृषी सहाय्यक यांनी प्रत्यक्ष शेतावर न जाताच कार्यालयात बसून पंचनामा तयार केल्याचे कागदपत्रांवरुन दिसत असल्याचा आक्षेप घेतला जात आहे. त्यांच्या पंचनाम्यावर कोणतीही तारीख नाही, पंचांची तसेच जमीन मालकाची स्वाक्षरी नाही. याउलट ज्या शेतकऱ्याला एक कोटी ९० लाख रुपये मोबदला मिळाला. त्याच्या पंचनाम्यावर पंचांसह जमीन मालकाची स्वाक्षरी आहे. या बाबत धर्मा पाटील यांनी १४ ऑगस्ट २०१२ रोजी हरकत घेतल्याचे दिसून येते.

जयकुमार रावल यांच्याकडूनही जमीन खरेदी

सौर ऊर्जा प्रकल्पासाठी २००९ मध्ये शंकरसिंग गिरासे यांची एक हेक्टर ७६ आर जमीन अधिसूचित झाली. भूसंपादन प्रक्रियेत निवाडा झालेला असताना ती एप्रिल २०१२ मध्ये स्थानिक आमदार तथा पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी खरेदी केली.

भूसंपादन प्रक्रियेत निवाडा झालेला असताना रावल यांनी ३५ लाख २० हजार रुपयात ही जमीन केल्याची माहिती काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी दिली. बेकायदेशीर पध्दतीने ही कागदपत्रे तयार केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

वडिलांनी कष्ट केले. न्याय्य मागणीसाठी मंत्रालयात अनेक खेटा घातल्या, तरीही न्याय मिळाला नाही. सरकार  गेंडय़ाच्या कातडीचे आहे याची जाणीव झाली. प्रकल्पाला दिलेल्या जमिनीपोटी योग्य मोबदला मिळायला हवा. मंत्रालयात काही घडले तर विखरण गावाचे नाव चर्चेत यायला हवे, अशी वडिलांची इच्छा होती. कारण जमीन विखरण गावाची जाते, आणि नाव मात्र दोंडाईचा गावचे चर्चेत येत आहे.  विखरण गावाचे नाव औष्णिक प्रकल्पाला दिले जावे, अशी त्यांची इच्छा होती.

      – महेंद्र पाटील (धर्मा पाटील यांचे पुत्र)