प्रबोध देशपांडे

राज्यात सर्वत्र करोनाचा धोका वाढत आहे. करोनासंसर्गाची लागण झाली किंवा नाही, याचे तात्काळ निदान होणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, पश्चिम विदर्भात प्रयोगशाळेचा अभाव असल्याने संशयितांचे नमुने शेकडो कि.मी. अंतरावर असलेल्या नागपूरलाच पाठवावे लागतात. त्यामुळे करोना तपासणी अहवालाचा अवघड प्रवास होत आहे. विदर्भात करोनाचा प्रसार वाढल्यानंतर ऐनवेळी अकोल्यात प्रयोगशाळा उभारण्याची धडपड सुरू झाली.

करोनाच्या संकटातून सावरण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. देशामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळले. नागपूर व यवतमाळ येथे करोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सर्व संशयितांचे नमुने तपासणीसाठी नागपूरला पाठवावे लागतात. नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सध्या विदर्भातील एकमेव प्रयोगशाळा आहे. त्या ठिकाणी संपूर्ण ११ जिल्हय़ांसह मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यातील नमुने तपासणीसाठी येतात. त्यामुळे प्रयोगशाळेवर अतिरिक्त भार वाढला असून, ती २४ तास कार्यान्वित ठेवली जात आहे. दिवसाला ८० ते ९० नमुन्यांची तपासणी केली जाते. यंत्रात एका वेळी २५ ते ३० नमुन्यांची तपासणी होते. सुमारे सात तासांची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निदान समोर येते. विदर्भाचे दुसरे टोक असलेल्या बुलढाण्यापासून सर्वच जिल्हय़ांतील नमुने नागपूरला पाठविले जात आहेत. त्यानंतर प्रयोगशाळेत क्रमांकानुसार तपासणी होते.  या सर्व प्रक्रियेत साधारणत: २४ तासांपेक्षा अधिकचा कालावधी लागत असल्याने संशयित व त्यांच्या नातेवाईकांसह संबंधित यंत्रणेचा जीव टांगणीला लागतो.  करोनाचा वाढता प्रभाव लक्षात आल्यावर अकोल्यातील सवरेपचार रुग्णालयात प्रयोगशाळा उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या. सध्या त्याचे काम सुरू आहे. शासनाने पाठवलेला ५० लाख रुपयांचा निधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला. या चाचणीसाठी लागणारे पीसीआर (पॉलिमरेज चेन रिअ‍ॅक्शन) यंत्र, त्याला लागणारी संलग्न यंत्रे प्राप्त झाली आहेत. प्रयोगशाळेसाठी आवश्यक बांधकाम करून यंत्रसामुग्री उभारण्यात येत आहे. त्याला पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेची अधिस्वीकृती मिळाल्यावर तपासणी सुरू करता येणार आहे.  सत्ताधारी व वैद्यकीय शिक्षण विभागातील वरिष्ठ स्तरावरील प्रशासनाने पाठपुरावा करून अकोल्यात अगोदरच प्रयोगशाळा उभारली असती, तर ऐनवेळी अशी धावपळ करण्याची वेळ आली नसती, अशी भावना व्यक्त होत आहे.

तपासणीसाठी ३५० कि.मी.चे अंतर

बुलढाण्यापासून नागपूरचे अंतर ३५० कि.मी. आहे. त्यामुळे बुलढाणा येथील संशयितांचे नमुने नागपूर येथे तपासणीला देण्यासाठी आठ ते नऊ तासांचा प्रवास करावा लागतो. अकोल्यावरून सहा तास, तर वाशीम येथूनही सात तासांचा वेळ लागतो. त्या तुलनेत अमरावती किंवा यवतमाळ येथून कमी वेळ लागतो. अकोल्यात अगोदरच प्रयोगशाळा उभारली असती, तर प्रवासाचा हा वेळ वाचून लवकरच निदान होऊ शकले असते.

प्रयोशगाळा उभारण्याचे काम सुरू आहे. त्या दृष्टीने एक प्राध्यापक व दोन तांत्रिक कर्मचाऱ्यांना नागपूर येथे प्रशिक्षणही देण्यात आले. त्या प्रयोगशाळेसाठी लागणाऱ्या यंत्राची मागणी वरिष्ठ पातळीवर नोंदवली. एक यंत्र खरेदीची प्रक्रिया हाफकिनने सुरू केली असून, निविदा काढण्यात आल्याची माहिती आहे. वरिष्ठ पातळीवरून यंत्र उपलब्ध होताच प्रयोगशाळा पूर्ण करून अधिस्वीकृतीची प्रक्रिया होईल. त्यानंतर तात्काळ प्रयोगशाळा सुरू करण्यात येईल.

– डॉ. शिवहरी घोरपडे, अधिष्ठाता, अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला