16 January 2021

News Flash

भाजपच्या खासदार, आमदारांमध्ये संघर्ष

संवेदनशील प्रश्नांपासून भामरे हे चार हात दूर राहणे पसंत करतात.

अनिल गोटे , सुभाष भामरे

धुळे जिल्ह्य़ातील चित्र; अनिल गोटे व सुभाष भामरे यांच्यातील वाद

केंद्रासह राज्यात सत्ता मिळालेल्या भाजपची वाटचाल अन्य पक्षांप्रमाणे सुरू असल्याचे अनेक घटनांमधून अधोरेखित होत आहे. सत्तास्थानी असणाऱ्या पक्षात अंतर्गत कुरबुरी वाढतात, मतभेद उफाळून येतात, हा आजवरचा अनुभव. त्यास भाजप अपवाद ठरलेला नाही. धुळे जिल्ह्य़ातही तोच कित्ता गिरविला जात आहे. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आणि भाजपचे आ. अनिल गोटे यांच्यातील राजकीय संघर्ष ते दर्शवत आहे.  डॉ. भामरे स्थानिक पातळीवर अधिक लक्ष घालतात. यामागे लोकसभा निवडणुकीऐवजी त्यांना विधानसभा निवडणुकीची इच्छा असल्याची चर्चा आहे. यामुळे की काय, आ. गोटे आणि डॉ. भामरे यांच्यातील संघर्ष  धारदार बनत असल्याचे चित्र आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघात मालेगाव शहर, मालेगाव ग्रामीण, धुळे ग्रामीण, सटाणा, धुळे शहर आणि शिंदखेडा तालुक्याचा भाग असे मतदारसंघ समाविष्ट होतात. हा मतदारसंघ खा. भामरे यांचे कार्यक्षेत्र आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात धुळ्याच्या खासदारांचा समावेश ही बाब मतदारांसह जिल्हावासीयांना समाधान देणारी ठरली होती. याचे फलित डॉ. भामरे यांच्या माध्यमातून मिळायला हवे, अशी अपेक्षा वाढली. त्या अनुषंगाने प्रयत्न करण्याऐवजी भामरे यांचा स्थानिक आमदाराशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष राजकीय संघर्षांत अधिक वेळ खर्ची पडत असल्याची भाजप पदाधिकाऱ्यांची भावना आहे. मनमाड-धुळे-इंदूर रेल्वे मार्ग, पाकिस्तानच्या हद्दीत शिरलेला भारतीय जवान चंदू चव्हाण यांची सुखरूप सुटका, राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेला अक्कलपाडा प्रकल्प, राज्य-केंद्र सरकारच्या अन्य योजना अशा विषयात स्वारस्य दाखविताना त्यांनी विरोधी पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी किंवा सत्तेत भागीदार राखूनही विरोधकांची भूमिका निभावणाऱ्या शिवसेनेला लक्ष्य न करण्याचे धोरण स्वीकारले. केवळ पंतप्रधान कशा महत्त्वाकांक्षी योजना राबवीत आहेत हे सांगण्यावर त्यांचा भर राहिला. आ. गोटे यांच्याशी स्पर्धा करताना प्रसंगी विरोधकांची अप्रत्यक्षपणे पाठराखण करण्याचे धोरण अवलंबिल्याचे दिसून येते.

दुसरीकडे गोटे यांनी ‘येतील त्यांच्या सोबत आणि येणार नाहीत त्यांच्या शिवाय’ आपले काम सुरू ठेवण्याचे जाहीर केले. भाजपचे लोकप्रतिनिधी असूनही त्यांनी अनेक प्रश्नांवर स्वपक्षातील नेते, मंत्री यांना लक्ष्य करीत सरकारला घरचा आहेर दिला. संवेदनशील प्रश्नांपासून भामरे हे चार हात दूर राहणे पसंत करतात. गोटे यांची कार्यपद्धती त्याउलट आहे. आपण सत्ताधारी पक्षात असलो म्हणून सामान्य जनता आणि शेतकरी विरोधी कृती झाकायची का, असा प्रश्न आ. गोटे यांनी अनेकदा उपस्थित केला. धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर भूमाफिया, दलाल यांचा समाचार घेत त्यांनी खळबळ उडवून दिली. भाजपमधील स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांतील गटबाजीचा असाच समाचार घेतला. त्यांच्या सडेतोड, आक्रमक कार्यपद्धतीमुळे भाजपमध्ये गोटे यांच्या विरोधात गट तयार झाला आहे. राजकारणात कडव्या भूमिकेत राहणाऱ्या गोटे यांना विरोधकांसोबत स्वकीयांशीही दोन हात करावे लागत आहेत. भाजपमधील मोठा गट त्यांच्या विरोधात काम करतो. ही बाब संरक्षण राज्यमंत्र्यांना दिलासा देणारी असली तरी या घडामोडी भाजपमधील बेदिलीचे दर्शन घडवत आहे.

गोटे यांनी धुळ्यात उभारलेली पांझरा चौपाटी बेकायदेशीर ठरवत विरोधकांनी ती जमीनदोस्त केली. ही चौपाटी काढल्यानंतर तेथे उद्यान साकारण्यात येणार होते, तेही झालेले नाही. विरोधकांनी चौपाटी पाडल्यानंतर गोटे यांनी त्याला लागूनच पांझराकाठी दोन्ही बाजूंनी रस्ते उभारणीचे काम युद्ध पातळीवर हाती घेतले. या कामातून आगामी निवडणुकीसाठी भाजपकडून पुन्हा उमेदवारी मिळविण्याचा गोटे यांचा प्रयत्न आहे. पक्षाने उमेदवारी नाकारली तरी ते केवळ विधानसभाच नाही, तर महापालिकेचीही निवडणूक लढविण्याच्या तयारीत असतील, असे आजचे चित्र आहे.

* संरक्षण राज्यमंत्रिपद भूषविणारे डॉ. भामरे स्थानिक पातळीवर अधिक लक्ष घालतात. यामागे आगामी लोकसभा निवडणुकीऐवजी त्यांना विधानसभा निवडणुकीची इच्छा असल्याची चर्चा आहे.

* परिणामी , आ. गोटे आणि डॉ. भामरे यांच्यातील संघर्ष दिवसागणिक अधिक धारदार बनत असल्याचे चित्र आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2018 1:10 am

Web Title: dispute between anil gote and subhash bhamre
Next Stories
1 विदर्भात पाणीवापर संस्थांचे बळकटीकरण रखडले
2 पश्चिम विदर्भात अवघे २१ टक्केकर्जवाटप
3 नाना पटोलेंची प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यपदी नियुक्ती; राहुल गांधींचे शिक्कामोर्तब
Just Now!
X