News Flash

एका डोळ्यात हसू अन् दुसऱ्यात आसू

सोलापूर, लातूरमधील द्राक्ष बागायतदारांची व्यथा

संग्रहित छायाचित्र

एजाज हुसेन मुजावर

करोना संकटाने जगभरासह संपूर्ण देशात थैमान घातल्यामुळे टाळेबंदी लागू होऊन अवघे अर्थचक्र थांबले असतानाच सोलापूर व लातूर भागातील द्राक्षे युरोपात निर्यात होत आहेत. वरकरणी ही घटना तशी सुखद आणि दिलासा देणारी असली तरी प्रत्यक्षात निर्यातीच्या द्राक्षाला मिळणारा दर निम्म्यापेक्षा कमी आहे. त्याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

सोलापूर व लातूर जिल्ह्य़ातील मिळून सुमारे तीनशे टन द्राक्षे नेदरलँड्स आणि ब्रिटनला निर्यात झाली आहेत. अजूनही ही निर्यात सुरूच आहे. मार्चअखेरपासून सुरू झालेली द्राक्षांची निर्यात शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुखद असली तरी प्रत्यक्षात त्यातून मिळणारे उत्पन्न खूपच कमी असल्यामुळे ‘एका डोळ्यात हसू अन् दुसऱ्या डोळ्यात आसू’ अशी संमिश्र भावना द्राक्ष निर्यातदार शेतकऱ्यांमध्ये दिसून येते.

करोना विषाणू प्रादुर्भाव सुरू होण्यापूर्वी निर्यातीच्या द्राक्षांना प्रतिकिलो ११० रुपये दर मिळत होता. परंतु करोनाचे संकट कोसळून देशभरात टाळेबंदी लागू झाल्यानंतर याच निर्यातक्षम द्राक्षांचा दर कोसळून तो प्रतिकिलो ५० रुपयांच्या खाली उतरला आहे. निम्म्यापेक्षा कमी दराने द्राक्षांची निर्यात करताना शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे. निर्यातक्षम द्राक्षे अतिशय उत्तम दर्जाची असतात. त्यात तडजोड करणे अशक्य असते. योग्य दर्जा राखता न आलेली द्राक्षे निर्यातीसाठी स्वीकारली जाऊच शकत नाहीत. चुकून अपेक्षित दर्जा न सांभाळलेली द्राक्षे आलीच तर ती स्वीकारली न जाता फेकून दिली जातात. त्याची झळ शेवटी संबंधित शेतकऱ्यांनाच सोसावी लागते.

द्राक्षांची निर्यात सुरू झाली आणि थोडय़ाच दिवसांत करोनाचे संकट आले. त्यानंतर काही दिवासांत निर्यातीला अडथळा आला. भारतात प्रमुख महानगरांतील बाजारपेठांसह विमान वाहतूकही बंद झाल्यामुळे द्राक्षांसह अन्य शेतमालाच्या स्थानिक विक्री आणि निर्यातीवर परिणाम झाला. द्राक्षांची बाजारपेठ तर ठप्पच झाली.

धास्तावलेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी द्राक्षांपासून बेदाणे निर्मिती करण्यावर भर देत आहेत. करोना संकटाच्या रूपाने डोक्यावर टांगती तलवार असताना आणि अवकाळी पावसाचेही संकट  सतावत असताना शेतातील तयार बेदाण्यांना बाजारपेठ मिळणे अशक्य होते. तेव्हा बऱ्याच शेतकऱ्यांनी संयम राखत तयार बेदाणे शीतगृहात ठेवण्यासाठी धावपळ के ली. यात जे शेतकरी बेदाणे घेऊन आले, त्यांना शीतगृहे उपलब्ध होऊ शकली. पंढरपूर, तासगाव परिसरात बघता बघता शीतगृहे बेदाण्यांनी भरून गेली. परिणामी नवीन आलेल्या बेदाण्यांना शीतगृहांमध्ये ठेवण्यासाठी जागा अपुरी पडू लागली. आजही अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्ष मळ्यांमध्ये तयार होऊन बेदाणा पडून आहे. त्यातच वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचे संकट कोणत्याही क्षणी उभे राहू शकते.

द्राक्षे वा बेदाणे निर्मितीसाठी शेतकऱ्यांनी केलेला खर्च कसा भरून निघेल, हा प्रश्न आहे.  नुकसान टाळण्यासाठी द्राक्षांपासून बेदाणे तयार करणे भाग पडले असता त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे भावही वाढले आहेत. बेदाणे निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालापैकी डिम्पिंग ऑइल, सोडा इत्यादी खरेदी करायचे तर त्यांची चढय़ा दराने विक्री झाली. एरवी, प्रति २० लिटर डिम्पिंग ऑइलची किंमत २५०० रुपये असते. ती ३८०० रुपये झाली. तर प्रति २५ किलो सोडय़ाचा दर १७५० रुपये असताना तोदेखील २७०० रुपयांपर्यंत चढय़ा भावाने खरेदी करणे भाग पडले.

बेदाणे तयार झाल्यानंतर तो बाजारात पाठविण्यासाठी मोठे खोके  लागतात. एका खोक्याची किंमत २५ रुपयांवरून ३६ रुपयांपर्यंत मोजली गेली. तर दुसरीकडे मजूर आणि मालवाहतुकीची सोय उपलब्ध होत नसल्यामुळे अतोनात नुकसान सोसताना शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे.

करोना फैलाव न झालेल्या देशांमधून भारतातील द्राक्षांना मागणी असली तरी त्याप्रमाणे आपण निर्यात करू शकत नाही. करोनामुळे  अडचणी आहेत. मालवाहतुकीपासून मुंबईत बंदरावर माल पोहोचविण्यात अडचणी आहेत. शासनाने टाळेबंदी पुकारताना या अडचणी दूर होण्याच्या दृष्टीने बंधने शिथिल करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असला तरी प्रत्यक्षात अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेमध्ये योग्य समन्वयाचा अभाव आहे. त्याचा फटका द्राक्ष मालालाच नव्हे तर सर्व शेतीमालाला बसत आहे.

– डॉ. सी. व्ही. हविनाळे, द्राक्ष बागायतदार, दक्षिण सोलापूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 12:39 am

Web Title: distress of grape gardeners in solapur latur abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 टाळेबंदीतही चोरटे सक्रिय
2 धुळ्यात आठ हजार जणांची तपासणी
3 पाचोऱ्यातील शिबिरात २०७ जणांचे रक्तदान
Just Now!
X