निसर्ग चक्रीवादळग्रस्त बागायतदारांना दिलासा देणारी बातमी आहे. नुकसानग्रस्त बागायतदारांना शासकीय मदत वाटपाचे काम अखेर सुरु झाले आहे. यासाठी आवश्यक निधी राज्यसरकारने जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केला आहे.  निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका रायगड जिल्ह्यातील बागायदारांना बसला आहे. वादळामुळे जवळपास २२ हजार हेक्टर क्षेत्रावरील बागांचे नुकसान झाले आहे. शासनाच्या निकषानुसार ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान असलेल्या बागायतदारांना शासकीय मदत दिली जाणार आहे. यात ११ हजार ४८० हेक्टर बागायत क्षेत्राचा समावेश आहे.

वादळामुळे नष्ट झालेल्या बागायतींच्या पंचनाम्याची कामे पुर्ण झाली आहेत. त्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे.

जिल्ह्यात भाजीपाला लागवडीखालील ८७ हेक्टर ४८ गुंठे क्षेत्राचे ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले आहे. याशिवाय केळी ९५ गुंठे क्षेत्रातील केळी, १ हेक्टर ६१ गुंठय़ावरील फुलशेती, तर १ हेक्टर ४० क्षेत्रावरील इतर पिकांचे नुकसान झाले आहे.

या शिवाय ८ हजार ७९ हेक्टरर वरील आंब्याच्या बागांचे, ८२० हेक्टर वरील नारळ बागांचे,  ८९६ हेक्टरवरील सुपारी बागांचे, तर १ हजार २६ हक्टर वरील काजू पिकांचे, तर ३२५ हेक्टरवरील इतर फळपिकांचे ३३ टक्के पेक्षा अधिक नूकसान झाले आहे. एकूण ११ हजार ३८९ हेक्टर वरील फळबागांचे ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्याबाबतचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे.

मात्र याआधीच राज्यसरकारने बागायतदारांना देय असलेली रक्कम जिल्हाप्रशासनाकडे वर्ग केली आहे. त्यामुळे मदत वाटपाचे काम आता सुरु करण्यात आले आहे. सात दिवसात ५५ हजार १११ बागायतदारांच्या खात्यात देय रक्कम जमा केली जाणार आहे.

‘वादळग्रस्त  शेतकऱ्यांना नुकसानभरपाई  देण्यासाठी राज्यासनाने निधी मुजूर केला असून तो प्राप्त झाला आहे. हेक्टरी ५० हजार रुपये याप्रमाणे मदत दिली जाणार आहे. संबंधित तालुक्यांच्या तहसिलदारांमार्फत मदतीचे वाटप सुरू करण्यात आले आहे.’

–   पांडूरंग शेळके, अधीक्षक कृषि अधिकारी , रायगड</p>