संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पक्षविरहीत शेतकरी सहकारी पॅनेलने १५ जागा जिंकत वर्चस्व प्रस्थापित केले. काँग्रेसच्या कदम-वसंतदादा गटाच्या रयत पॅनेलने ६ जागी विजय संपादन करीत असताना माजी मंत्री मदन पाटील व भाजपा आ. विलासराव जगताप यांचे चिरंजीव मनोज जगताप यांचा धक्कादायक पराभव केला.
मंगळवारी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी झाली. या निवडणुकीत जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी सहकार पॅनेलचे विजय उमेदवार असे- उदयसिंह देशमुख, गणपती सगरे, आ. अनिल बाबर, सुरेश पाटील, खा. संजयकाका पाटील, बी. के. पाटील, संग्रामसिंह देशमुख, विलासराव िशदे, प्रा. सिकंदर जमादार, बाळासाहेब व्हनमोरे, चंद्रकांत हाक्के, श्रीमती श्रद्धा चरापले आणि कमल पाटील. तसेच दिलीप पाटील व मानसिंगराव नाईक हे बिनविरोध निवडून आले आहेत, तर आ. डॉ. पतंगराव कदम यांच्या नेतृत्वाखालील रयत सहकार पॅनेलचे विजयी उमेदवार असे- विशाल पाटील, विक्रमसिंह सावंत, डॉ. प्रताप पाटील, महेंद्र लाड, सी. बी. पाटील आणि मोहनराव कदम.
जिल्हा मध्यवर्ती बँकेवर गेली अडीच वर्ष प्रशासकीय कारकीर्द होती. मंगळवारी झालेल्या मतदानानंतर आता बँकेचा कारभार संचालक मंडळाकडे जाणार असल्याने या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षविरहीत आघाडी करण्यासाठी पुढाकार घेऊन भाजपा, काँग्रेस आणि शिवसेना यांना सोबत घेऊन शेतकरी सहकार पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढविली होती. अंतिम क्षणी काँग्रेसचे माजी मंत्री मदन पाटील यांना स्थान देण्यात आले होते. यामुळे शेवटच्या क्षणी काँग्रेसने आपले पॅनेल तयार करून मदानात उडी घेतली.
या निवडणुकीत लक्षवेधी लढत ठरलेल्या मिरज आणि जत येथील सोसायटी गटात काँग्रेसने राष्ट्रवादीला पराभवाचा धक्का देताना मोहरे गारद केले. वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांनी चुलत बंधू माजी मंत्री मदन पाटील यांचा ४ मतांनी पराभव करीत धक्कादायक विजय नोंदविला, तर जत तालुका सोसायटी गटामध्ये चुरशीने झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे विक्रमसिंह सावंत यांनी भाजपा आमदार विलासराव जगताप यांचे चिरंजीव मनोज जगताप यांचा ६ मतांनी पराभव केला.
मतदारांनी धनशक्ती अमान्य करीत अभद्र युतीला नाकारले असल्याची प्रतिक्रिया विशाल पाटील यांनी व्यक्त केली, तर दबावाचे राजकारण कायम यशस्वी होत नसल्याचे या निवडणुकीत मतदारांनी आ. विलासराव जगताप यांना दाखवून दिले असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे विक्रमसिंह सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
 विजयी पॅनेलचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. जयंत पाटील या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करीत असताना म्हणाले की, आमची नेहमी समजूतदारपणाचीच भूमिका राहिली आहे. यापुढेही सर्वाना सोबत घेऊन बँकेचा कारभार चांगल्या पद्धतीने केला जाईल. बँकेत आमचीच सत्ता येणार हे अगोदर निश्चित होते, मात्र मिरज आणि जत सोसायटी गटामध्ये धनशक्तीमुळेच आमचा पराभव झाला.