सांगलीतील कन्या महाविद्यालयाचा उपक्रम

‘व्हॉटसअ‍ॅप’सारख्या फुकट आणि गतिमान शुभेच्छांच्या जगात कुणी मोडी लिपीत शुभेच्छा पत्रे तयार करण्याचा संकल्प केला तर..! याला लोक चक्क वेडेपणा म्हणतील. पण सांगलीतील गरवारे कन्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हा वेडेपणा केलाय. मराठी भाषा-संस्कृतीचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या आणि आजमितिस अस्तंगत झालेल्या मोडी लिपीच्या जतन-संवर्धनाच्या हेतूने त्यांनी हा उपक्रम हाती घेतलाय. मोडी लिपीत मोठय़ा प्रमाणावर झालेला हा पहिलाच प्रयोग आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी लोकांचे व्यवहार जास्त सुलभ व्हावेत यासाठी जाणीवपूर्वक मोडी या लोकांच्या लिपीला चालना दिली. त्याकाळी राज्यकारभारात प्रामुख्याने फारसी, अरबी, उर्दु लिपीचा प्रभाव होता. मराठी राज्यातील मोडीचा हा सन्मान पेशवाईच्या अस्तापर्यंत सुरू होता. मात्र ब्रिटिशांच्या काळात मर्यादित होऊ लागलेली ही लिपी स्वातंत्र्योत्तर काळात जवळपास अस्तंगत झाली.

तथापि, आजही बहुतांश ऐतिहासिक कागदपत्रे मोडीतच आहेत. जुने संदर्भ, अभ्यास, न्यायनिवाडे करताना मोडी लिपीचाच आधार घ्यावा लागतो. मात्र, यासाठी या लिपीतील अभ्यासक, जाणकार मिळत नाहीत. यामुळे इतिहासाशी असलेले नाते मोठय़ा प्रमाणात तुटण्याचा धोका आहे. हा धोका ओळखून राज्यात अनेक ठिकाणी आता शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ स्तरावर मोडी प्रशिक्षण वर्ग सुरू झाले आहेत. सांगलीतील गरवारे कन्या महाविद्यालयातही असाच शिवाजी विद्यापीठाच्या निरंतर शिक्षण योजनेअंतर्गत मानसिंगराव कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली चार वष्रे प्रशिक्षण वर्ग घेण्यात येत आहेत.

परंतु या अशा वर्गातून मोडी शिकली तरी त्याचे समाज व्यवहाराशी असलेले नाते खूपच कमी असल्याने तिच्या प्रसार आणि जतनाबाबतही मर्यादा येत आहेत. हे ओळखून, तिचे समाजाशी नाते जोडण्यासाठीच या महाविद्यालयाने हा उपक्रम पुढे आणला. प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी, प्रा. ऊर्मिला क्षीरसागर यांनी यंदा मोडी लिपीतील शुभेच्छा पत्र, भेट कार्ड तयार करण्याची कल्पना मांडली. त्यासाठी स्पर्धा जाहीर केली. यामध्ये ८० हून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या विद्यार्थ्यांनी मोडीतील शेकडो   शुभेच्छापत्रे तयार केली आहेत. आता ही शुभेच्छापत्रे पहाताना, ती समजून घेताना उर्वरित समाजही नकळतपणे या लिपीकडे वळू लागला आहे. सध्या ही शुभेच्छापत्रे विक्रीसाठी न ठेवता ती सर्वाना पाहण्यासाठी खुली ठेवली आहेत. लवकरच त्यांचे एक प्रदर्शन भरवले जाणार आहे.