आत्महत्या करून संसार उघडय़ावर पाडू नका, वृद्ध मातापित्यांना निराधार करू नका आणि लेकराबाळांसह कुटुंबावर आघात होईल असे करू नका. सरकार जी लाख-दोन लाखांची मदत देते त्याने काहीही होणार नाही. स्वत:चे आयुष्य संपविण्यापेक्षा ज्या सरकारने आपल्यावर ही वेळ आणली त्यांच्या विरोधात खंबीरपणे उभे राहा, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. येथील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मदानावर रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसची दुष्काळ परिषद पार पडली. या वेळी पवार बोलत होते.पवार म्हणाले की, सध्या मराठवाडय़ातील शेतीची अवस्था अत्यंत बिकट आहे. कापूस क्विंटलऐवजी किलोने मोजावा लागेल अशी पिकांची परिस्थिती झाली आहे. वेळीच उपाययोजना झाली नाही तर आम्ही या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही पवार यांनी दिला. दुष्काळामुळे रोजगारासाठी बाहेर पडणाऱ्यांमध्ये मराठवाडय़ातील नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. हे थांबले पाहिजे. मराठवाडा आणि विदर्भातील जमीनदार आता एकरावर आले आहेत. गेल्या दोन महिन्यांत या भागातले स्थलांतर वाढले आहे. िपपरी-चिंचवडसारख्या भागात मराठवाडय़ातून काम मिळविण्यासाठी जथ्थेच्या जथ्थे येत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आपण सार्वजनिक जीवनात आहोत, पण एवढय़ा मोठय़ा प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या कधीच झाल्या नाहीत याकडे पवारांनी लक्ष वेधले.

दुष्काळामुळे रोजगारासाठी बाहेर पडणाऱ्यांमध्ये मराठवाडय़ातील नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. हे थांबले पाहिजे.
शरद पवार,अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस</strong>