चीनने १९६२ च्या युद्धानंतर ४५ हजार स्क्वेअर किलोमीटरचा आपला भूभाग ताब्यात घेतला आहे. हे आम्ही विसरू शकत नाही. सध्या त्यांनी आपला भूभाग ताब्यात घेतला आहे की नाही माहिती नाही. परंतु, आपण जेव्हा याबद्दल चर्चा करतो तेव्हा आपल्याला भूतकाळ माहिती असणं आवश्यक आहे. देशाच्या सुरक्षेबाबत राजकारण नको, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बोलून दाखलं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

शरद पवार रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळ बैठक व पदाधिकारी निवडीच्या निमित्ताने साताऱ्यात होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भारत-चीन मधील संबंध सध्या दुरावलेले आहेत. यामध्ये भारत कमी पडला का? असे विचारले असता पवार बोलत होते.

भारत-चीनचा प्रश्‍न हाच मुळात संवेदशील आहे. गलवान खोऱ्यातून जाणारा रस्ता भारताने बनविलेला आहे. या रस्त्याचा वापर आपण सियाचीनमधील आपल्या भूभागात जाण्यासाठी करतो. या रस्त्याच्या एका बाजूला चीन आणि दुसऱ्या बाजूला आपली सीमा आहे. हा रस्ता भारताचा असूनही चिनी सैन्य काही वेळा या रस्त्यावर येते. त्यावेळी दोन्हीकडच्या सैन्यात धरपकड होते. त्यातून धक्काबुकीचे प्रकार होतात.

मी संरक्षण मंत्री असताना १९९३ मध्ये चीनला गेलो होतो. त्यावेळी तेथील संरक्षण मंत्र्यांसोबत चर्चा करून सीमेवरील सैन्य कमी करण्याबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर नरसिंहराव पंतप्रधान असताना चीनला गेले, त्यावेळी त्यांच्याशी आपला करार झाला. त्यानंतर दोन्ही बाजूचे सैन्य कमी केले.गलवान भागात दोन्ही देशांनी कधीही बंदुकीचा वापर केला नाही. ज्यावेळी सीमेवर संघर्ष होतो, त्यावेळी फायरिंग होते. पण येथे फायरिंग होत नाही, केवळ धक्कबुकी होते; कारण तेथे करार झालेला आहे. मध्यंतरी जे काही झाले ते आपल्या रस्त्यावर चीनच्या सैन्यांनी अतिक्रमण केल्यामुळे झाले. तसेच, गस्त घालत असताना कोणीही येऊ शकते. त्यामुळे या प्रकरणी संरक्षण मंत्रालयावर आरोप करणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

राहुल गांधी म्हणतात की, चीनने आपला भूभाग बळकावला आहे, याबाबत विचारले असता पवार म्हणाले, काही भाग चीनने बळकावला हे खरे आहे. चीनच्या युद्धानंतर ४५ हजार स्क्वेअर किलोमीटरचा आपला भूभाग चीनने ताब्यात घेतला आहे,  तो आज घेतलेला नाही. पण आपण आरोप करतो त्यावेळी पूर्वीच्या काळी काय घडले हे माहीत असायला हवे. या गोष्टीचे राजकारण होऊ नये, कारण हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्‍न असून हा प्रश्‍न राजकारणाच्या पुढचा आहे. महाराष्ट्राची इतर राज्यांच्या तुलनेत आर्थिक परिस्थिती खूपच चांगली आहे. उद्योगधंदे आपापली काळजी घेऊन सुरु करणे गरजेचे असल्याचे व परप्रांतीय मजूर पुन्हा येऊ लागल्याचे त्यांनी सांगितले.काहीही करून राज्याचा आर्थिक गाडा रुळावर आला पाहिजे, असंही ते म्हणाले.

आम्ही जे कबूल केले होते, त्याची अंमलबजावणी करत आहोत –
राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अंतर्गत समझोता होता की, विधान परिषदेची एक जागा त्यांच्या संघटनेला दिली जाईल. त्यानुसार आम्ही जे कबूल केले होते, त्याची अंमलबजावणी करत आहोत. मी त्यांचा अभ्यास संसदेत बघितला आहे, त्यांना शेती प्रश्‍नांची उत्तम जाण आहे. अशी व्यक्ती राज्याच्या सभागृहात आली तर आम्हाला आनंद वाटेल. असे सांगत महाविकास आघाडीत कोणतीही कुरबुर नाही. तीनही पक्ष एकत्र काम करतात व नेतेमंडळी एकत्र बसून कोणताही धोरणात्मक निर्णय घेतात. त्यामुळे सरकारसंबंधी कोणतीही अडचण वाटत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.