प्रबोध देशपांडे

प्रयोगशील शेतकरी विविध प्रयोगातून शिवारात नाविन्यपूर्ण शोध लावतात. तुरीच्या शेंगामध्ये साधारण तीन ते चार दाणे असतात. अकोला जिल्हय़ातील दिग्रसचे राजेंद्र ताले यांनी सेंद्रिय शेतीद्वारे सात दाण्यांच्या शेंगाचे म्हणजे जवळ जवळ दुप्पट उत्पादन घेतले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील ‘अ‍ॅग्रोटेक २०१९’या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात याच प्रकारच्या प्रयोगशील शेतकऱ्यांच्या संशोधनात्मक वृत्तीचे दर्शन घडून येत आहे. विदर्भातील विविध शेतकऱ्यांच्या यशस्वी प्रयोगांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.

‘अ‍ॅग्रोटेक २०१९’ मध्ये शेतीत अभिनव प्रयोग करणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांचे स्वतंत्र दालन होते. प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांसाठी  ते विशेष आकर्षण ठरले. अकोला जिल्हय़ाच्या पातूर तालुक्यातील दिग्रस बु. येथील शेतकरी राजेंद्र ताले यांनी कडधान्य शेतीत यशस्वी प्रयोग केला. ताले यांनी सेंद्रिय शेती करताना अभिनव पद्धतीने तुरीचे पीक घेतले. त्यांच्या उंच वाढणाऱ्या झाडाला सहा ते सात दाण्याच्या तुरीच्या शेंगा उगवतात, हे वैशिष्ट आहे. साधारणपणे तुरीच्या शेगामध्ये तीन ते चार दाणे येतात. मात्र, ताले यांनी जवळ जवळ दुप्पट म्हणजे सहा-सात दाणे असणारे तुरीचे पीक घेतले. सहा एकरच्या शेतीमध्ये ते लाखो रुपयांचे उत्पादन घेतात. यासाठी ते कृषी विद्यापीठाच्या माहुरी वाणाचा वापर करतात. यासोबतच गोमूत्र, वनस्पतीजन्य अर्क व सेंद्रिय खतापासून निर्मित विषमुक्त सेंद्रिय भाजीपाला, केळी, पपईचेही उत्पादन घेतात. उत्पादनापुरतेच मर्यादित न राहता शेतमालावर प्रक्रिया करून तो माल थेट ग्राहकांपर्यंत नेत असल्याचे राजेंद्र ताले यांनी सांगितले. त्यांच्या सारख्या प्रयोगशील शेतकऱ्यांच्या नव-नवीन कल्पनामुळे इतरांनाही प्रयोगशील उपक्रमाची दिशा मिळते.

अभिनव प्रयोग

भेट देणाऱ्या शेतकऱ्यांचा विविध प्रयोग जाणून घेण्याकडे विशेष कल दिसून आला. अभिनव तंत्रज्ञान, कौशल्य विकास, पूरक व्यवसाय, गट शेती, बदलते हवामान, पीक पद्धती, एकंदरीत उत्पन्न वाढ आदीबाबत शेतकऱ्यांनी प्रयोग केले. या प्रयोगातून शेतकरी समृद्ध कसे झाले याची माहितीची देवाण-घेवाण झाली.