जिल्ह्य़ाची करोनाबाधित रुग्णसंख्या दहा दिवसांतच दुपटीने वाढून ती २०७ झाली आहे. आज, शनिवारी बाधितांच्या संख्येत ९ ने वाढ झाली तर ६१ जणांचे अहवाल नकारात्मक आले. तसेच १४ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना आज रुग्णालयातून सोडण्यात आले. त्यामुळे आता जिल्ह्य़ातील करोनामुक्तांची संख्या आता १०९ झाली आहे.

दहा दिवसांपूर्वी जिल्ह्य़ातील बाधितांच्या संख्येने शंभरी ओलांडली होती. दि. २८ मे राजी रुग्णसंख्या १०३ झाली होती. त्यानंतर दहाच दिवसांत जिल्ह्य़ातील बाधितांची संख्या दुपटीने वाढली व ती आता २०९ झाली आहे. त्यामध्ये स्टेशन रस्त्यावरील एक वृद्ध, कोठी भागातील १३ वर्षीय मुलगी, माळीवाडी ब्राह्मणगल्ली भागातील १८ वर्षीय युवक अशा नगर शहरातील तिघांचा समावेश आहे. पाथर्डी तालुक्यातीर चिंचपूर इजदे येथे मुंबईहून आलेल्या ४० वर्षीय महिला व १८ वर्षीय मुलाला संसर्ग झाल्याचे आढळले. राहाता तालुक्यातील निमगाव कोऱ्हाळे, संगमनेर शहर व शेवगाव तालुक्यातील लांडेवस्ती येथील मुंबईहुन आलेला २७ वर्षांचा युवक व आघोडी येथे ठाण्यातून आलेल्या ४५ वर्षांच्या महिलेला संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. याशिवाय कोपरगाव येथील डॉक्टर महिला व संगमनेर येथील दोघांचा खासगी प्रयोगशाळेतील अहवालही सकारात्मक आला आहे. या व्यतिरिक्त आज आणखी १४ बाधित करोनामुक्त झाले. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यामध्ये राहाता तालुक्यातील ५, अकोले तालुक्यात २, संगमनेर तालुक्यातील ३, पारनेर, शेवगाव, राहुरी व कर्जत येथील प्रत्येकी एक रुग्ण बरा झाल्याने त्याला रुग्णलयातून सोडण्यात आले.  महापालिका क्षेत्रात ४६, ग्रामीण भागात १०४, इतर जिल्ह्य़ातून आलेले ४७, इतर राज्य व देशातून आलेल्या बाधितांची संख्या १० आहे. जिल्ह्य़ात सध्या ८७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्य़ातील २ हजार ९०४ जणांच्या स्रावांची तपासणी करण्यात आली. त्यातील २ हजार ६३४ नकारात्मक आले आहेत. फेटाळलेले २६, निष्कर्ष न घिालेले १८ तर प्रलंबित अहवालाची संख्या २६ आहे.