चरित्र प्रकाशन समिती सदस्यांमधील बेबनाव चव्हाटय़ावर

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘प्रॉब्लेम ऑफ रूपी- इट्स ओरिजिन अ‍ॅण्ड इट्स सोल्यूशन’ या इंग्रजी ग्रंथाचा ‘रुपयाचा प्रश्न- उद्गम आणि उपाय’ हा मराठी अनुवाद अयोग्य असल्याचा साक्षात्कार चरित्र साधने प्रकाशन समितीला तब्बल २२ वर्षांनी झालेला आहे. मात्र, बाबासाहेबांचे अर्थविषयक विचारधन मराठी वाचकांना उपलब्ध होण्यास आणखी किती दिवस लागतील याविषयी समितीला खात्रीपूर्वक सांगता येत नाही. यामुळे ग्रंथ प्रकाशनावरून समिती सदस्यांमधील बेबनाव चव्हाटय़ावर आला आहे.

डॉ. आंबेडकर यांचे विचारधन मराठी वाचकांपर्यंत पोहचावे म्हणून त्यांच्या सर्व ग्रंथाचे मराठी अनुवाद करून ते प्रकाशित करण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू चरित्र साधने प्रकाशन समितीचे आहे. या समितीला ‘प्रॉब्लेम ऑफ रूपी-इट्स ओरिजिन अँड अँड इट्स सोल्यूशन’ या इंग्रजी ग्रंथाचा ‘रुपयाचा प्रश्न- उद्गम आणि उपाय’ हा मराठी अनुवाद २२ वर्षांपूर्वी प्राप्त  झाला. तज्ज्ञांच्या अंतिम मान्यतेनंतर तो छपाईसाठी पाठवण्यात आला. परंतु दरम्यानच्या काळात समितीत फेरबदल झाले आणि तत्कालिन सदस्य सचिवांनी अनुवादाला दिलेली मान्यता विद्यमान समितीने अमान्य केली. यामुळे मराठी अनुवादीत ग्रंथ प्रकाशित होऊ शकला नाही. डॉ. आंबेडकर यांनी विविध विषयांवर विपुल लेखन केले. समितीला बाबासाहेबांचे १७ मराठी अनुवाद झालेले ग्रंथ प्रकाशित करावयाचे आहेत. मात्र समितीचे काम अतिशय संथगतीने चालू असल्याकडे अनेक आंबेडकरी अनुयायींनी वेळोवेळी लक्ष वेधले. परंतु    दर्जेदार ग्रंथ उपलब्ध होण्यासाठी अनुवादक उपलब्ध होत नाहीत. जे उपलब्ध आहेत, ते वृद्धापकाळामुळे वेळेत अनुवाद करून देत नाही, या कारणांची ढाल समितीतर्फे  पुढे केली जात आहे.

बाबासाहेबांच्या अनेक ग्रंथांपैकी ‘प्रॉब्लेम ऑफ रूपी -इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्यूशन’ हा एक इंग्रजी ग्रंथ. या ग्रंथाच्या मराठी अनुवादाचे काम राज्य सरकारने वर्धा येथील ग्रामीण सेवा महाविद्यालयातील अर्थशास्त्राचे प्रा. डॉ. विजय कविमंडन यांच्याकडे १९९४ ला दिले. त्यांनी दोन वर्षे त्यावर काम करून सुमारे ७०० पानांचा अनुवाद केला. अनुवादाच्या दर्जाबाबत तज्ज्ञांचा समाधानकारक अहवाल १ सप्टेंबर १९९६ ला चरित्र साधने प्रकाशन समितीला सादर करण्यात आला. या समितीने तो प्रकाशनासाठी स्वीकारला. त्यानंतर २००८ मध्ये डॉ. कविमंडन यांना अंतिम मुद्रितशोधनासाठी या अनुवादाची प्रत पाठवण्यात आली. समितीच्या २२ ऑक्टोबर २००८ रोजीच्या बैठकीत या अनुवादाच्या अंतिम छपाईला मान्यताही देण्यात आली होती. याबाबत  डॉ.कविमंडन यांनी खेद व्यक्त केला. ते म्हणाले, तज्ज्ञांची मान्यता आणि छपाईसाठी पाठवण्यात आलेला ग्रंथ प्रकाशित न होणे अनाकलनीय आहे.

केवळ एखाद्याला इंग्रजी आणि मराठीचे ज्ञान आहे म्हणून त्यांच्याकडून अनुवाद करवून घेतल्यास मूळ हेतू साध्य होणे अशक्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या उद्देश्याने आणि ज्या भावनेने ग्रंथ लिहिले त्याबाबी अनुवादित ग्रंथात येणे आवश्यक आहे. या अनुवादाबाबत असेच घडले आणि यामुळे समितीच्या सदस्यांमध्ये एकमत होऊ शकले नाही. यामुळे हा अनुवाद बाजूला ठेवून नव्याने अनुवाद केला जाणार आहे.’’

– अविनाश डोळस, चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव.