डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केलेल्या सचिन अंदुरेच्या सीबीआय कोठडीत पुणे न्यायालयाने दोन दिवसांची वाढ केली आहे. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांची एकत्रित चौकशी करायची असल्याने सीबीआय कोठडी वाढवून देण्याची मागणी सीबीआयच्या वतीने करण्यात आली.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी तपास यंत्रणांनी ऑगस्टमध्ये सचिन अंदुरेला अटक केली होती. गुरुवारी अंदुरेला सीबीआयने पुणे न्यायालयात हजर केले. सरकारी वकिलांनी सचिनची सीबीआय कोठडी दोन दिवसांनी वाढवून द्यावी, अशी विनंती केली. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांची एकत्रित चौकशी करणे गरजेचे असल्याने कोठडी वाढवून देण्याची आवश्यकता आहे, असा युक्तिवाद सीबीआयच्या वतीने करण्यात आला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर सचिन अंदुरेच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ केली. सचिन अंदुरेला १ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवले जाणार आहे.

दाभोलकर हत्येत प्रत्यक्ष सहभागाची कबुली देणारा शरद कळसकर हा सध्या एटीएसच्या कोठडीत आहे. त्याचा ताबा मिळवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे सीबीआयच्या वतीने कोर्टात सांगण्यात आले.

गौरी लंकेश हत्या प्रकरणात तीन आरोपींचा ताबा मिळवण्यासाठी कोर्टात अर्ज करण्यात आला आहे. गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपींचा दाभोलकर हत्याप्रकरणाशी संबंध आहे. गौरी लंकेश हत्येतील आरोपी सचिन अंदुरेच्या संपर्कात होते. सचिनच्या मेहुण्याकडे सापडलेल्या पिस्तूलद्वारेच लंकेश यांची हत्या केल्याचे समोर आले आहे, अशी माहितीही सीबीआयने न्यायालयात दिली. त्यामुळे सचिन अंदुरेची पोलीस कोठडी वाढवून द्यावी, असा युक्तिवाद सीबीआयच्या वतीने करण्यात आला.