|| संतोष मासोळे

प्रतिकूल परिस्थितीची चर्चा होत असतांनाही धुळे लोकसभा मतदार संघातून संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरेंनी मिळविलेल्या दणदणीत विजयाची अनेक कारणे आता सांगण्यात येत असली तरी प्रामुख्याने मोदी लाट, विविध कारणांमुळे मिळालेली सहानुभूती आणि ग्रामीण भागातील विकास कामे या त्रिसूत्रीचा त्यांच्या विजयात मोठा वाटा राहिला आहे. डॉ. भामरेंची स्वच्छ प्रतिमा, त्यांच्याकडे असलेले संरक्षण राज्यमंत्रिसारखे पद, लोकांमध्ये त्यांच्याविषयी असलेला आदर, राष्ट्रीय सुरक्षेच्या (सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक) प्रत्येक निर्णयात डॉ.भामरेंच्या सहभागामुळे लोकांमध्ये भामरेंविषयी सहानुभूती निर्माण झाली होती. गिरीश महाजन, जयकुमार रावल या मंत्र्यांचीही मोलाची साथ त्यांच्या विजयासाठी कारणीभूत ठरली. मालेगाव बाह्य़, धुळे शहर, शिंदखेडा आणि बागलाण विधानसभा मतदार संघात डॉ.भामरेंना मोठय़ा प्रमाणात मतदारांची साथ लाभली. मालेगाव मध्यव्यतिरिक्त धुळे शहर, धुळे ग्रामीण, बागलाण आणि शिंदखेडा मतदार संघातून काँग्रेसचे कुणाल पाटील यांना मताधिक्य मिळण्याची अपेक्षा होती. ती पूर्णपणे फोल ठरली. धुळे ग्रामीण हा आमदार पाटील यांचा विधानसभा मतदारसंघ असूनही त्या ठिकाणीही मतदारांनी त्यांना नाकारले. मोदींचा करिष्मा पुन्हा एकदा चालल्याने काँग्रेसची धूळधाणच झाली. ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्याच मुलाला काँग्रेसने उमेदवारी दिल्याने घराणेशाहीचा आरोप झाला.

कुणाल पाटील यांना काँग्रेससह त्यांच्या सहकारी पक्षांनी हवी तशी साथ दिली नाही. त्यांना उमेदवारी मिळाल्याने काँग्रेसमधील काहींचा अपेक्षाभंग झाला. यातून त्यांच्याविरोधात नाराज गट सक्रिय झाला. राष्ट्रवादीचे राजवर्धन कदमबांडेंनी प्रयत्नांमध्ये कसर ठेवली नसली तरी त्यांच्याच पक्षातील काही नेते आणि कार्यकर्त्यांनी कुणाल यांच्या विजयासाठी हवी तशी मेहनत घेतली नाही. काँग्रेस, राष्ट्रवादीतील काही विरोधकांनी गुप्तपणे कुणाल यांच्या विरोधात प्रचार केल्याचेही दिसून आले. शिवाय, केवळ स्वत:च्या संस्थेतील कर्मचाऱ्यांवर विसंबून कुणाल यांच्यासाठी प्रचार यंत्रणा राबविली गेली. काही कर्मचारी मनाने, तर काही नाराज कर्मचारी हे केवळ नाईलाजाने मतदार संघात भटकंती करीत होते. काही कर्मचाऱ्यांनी आपला असंतोष विरोधी प्रचार करून काढला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची सक्षम प्रचार यंत्रणा नसल्याने प्रचारात अनेक त्रुटी राहिल्या. दोन्ही पक्षांनी मराठा उमेदवार दिल्याने निवडणूक चुरशीची होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. काँग्रेसच्या प्रचारात कुणाल यांनी काढलेल्या ‘छातीत आलेली कळ’ हा मुद्दा डॉ.भामरेंनी कळीचा मुद्दा बनविला. संपूर्ण मतदार संघात हा मुद्दा गाजला. त्यामुळे मतांचे धुव्रीकरण होऊन हिंदुत्वावर स्वार असलेल्या मतदारांची डॉ. भामरे यांना सहानुभूती मिळाली आणि त्यांचा ऐतिहासीक विजय साकार झाला.