नागपूरच्या पाचगाव पोलीस चौकीत एका पोलिसाने मद्यधुंद अवस्थेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना शिव्यांची लाखोली वाहिल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे, पाचगाव हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आदर्श गाव योजनेसाठी दत्तक घेतलेलं गाव आहे. दरम्यान, या पोलिसाचं निलंबन करण्यात आलं आहे.

प्रदीप मने असं निलंबीत केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. 24 ऑक्टोबरच्या मध्यरात्री गावात झालेल्या एका भांडणाची तक्रार करायला काही तरुण पाचगाव पोलीस चौकीत गेले होते. मात्र, त्या ठिकाणी उपस्थित प्रदीप मने नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याने त्या तरुणांची तक्रार लिहून घेण्यास नकार दिला आणि शिवीगाळ केली. दारु पिऊन धिंगाणा घालणाऱ्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे पोलीस महासंचालक, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना सर्वांना शिव्या देणाऱ्या या पोलिसाचा प्रताप तक्रार करायला आलेल्या तरुणांनी मोबाइलमध्ये कैद करण्याचा प्रयत्न केल्यानंतर हा पोलीस अजूनच भडकला, आणि त्याने अजूनच शिव्या द्यायला सुरूवात केली होती. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर या कर्मचाऱ्यावर पोलीस अधिक्षकांनी निलंबनाची कारवाई केली आहे.