मुंबई शहराच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीचा वापर कायदा व सुव्यवस्था, गुन्हे, दहशतवादी कारवाया आणि वाहतूक संबंधाने करण्यात येत आहे. जानेवारी महिन्यापासून या सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे ई-चलन फाडण्यात येतील, अशी माहिती गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली.
मुंबई आणि पुणे शहरात सीसीटीव्ही बसविण्याच्या निविदा प्रक्रियांमध्ये अनियमितता झाली असल्याचा आरोप आमदार आनंद गाडगीळ, संजय दत्त यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून केला.
या लक्षवेधीला उत्तर देताना डॉ. रणजीत पाटील म्हणाले, मुंबई शहरात सीसीटीव्ही बसविण्याचे काम लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो कंपनीला देण्यात आले. या निविदा प्रक्रियेत काही अनियमितता झाली असल्यास त्याची चौकशी करण्यात येईल. मुंबईत तीन टप्प्यात ६ हजार २० सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात ४३० ठिकाणी १ हजार २३१ कॅमेरे बसविण्यात आले असून त्यापैकी १ हजार १५९ सुरू आहेत. आतापर्यंत या सीसीटीव्हीच्या माध्यमातून गणपती विसर्जनात वाहतूक व्यवस्था आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यात मोठी मदत झाली आहे. त्याशिवाय झेब्रा क्रॉसिंग ओलांडणे, सिग्नल तोडणे, एका दुचाकीवर तीनजण स्वार होणे, विना हेल्मेट वाहन चालविणे आदी स्वरूपाच्या वाहतूक नियम तोडणाऱ्या ५ हजार, ८०० जणांवर कारवाई करून १ लाख, ४५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. जानेवारीपासून वाहतूक नियम मोडणारे आणि सीसीटीव्हीत कैद झालेल्यांची चालान पावती न फाडता ई-चलन व्यवस्था सुरू करण्यात येईल, अशी माहिती दिली.