खर्चीक रासायनिक शेतीतून येणाऱ्या दुप्पट उत्पादनापेक्षा अल्पखर्ची देशी बियाण्यांची शेती साधून दुप्पट उत्पन्न घेण्याचा किफायतशीर मार्ग नैसर्गिक शेती अभियानाने शोधून काढला आहे. सेंद्रीय शेतीचे पुरस्कर्ते असणाऱ्या डॉ. स्वामिनाथन फाऊंडेशन, धरामित्र या संस्थांनी हा मार्ग दाखविला होता. पण या मार्गावरून चालत तो किफायतशीर असल्याची शेकडो उदाहरणे मगन संग्रहालयाने पुरस्कृत केलेल्या देशी वाणाच्या लोकचळवळीतून पुढे आली आहेत.

गांधीवादी विख्यात संस्था मगन संग्रहालयाने देशी बियाण्यांचे संरक्षण व संवर्धनाचे काम २००६ पासून सुरू केले होते. प्रारंभीच्या चार पाच वर्षांत देशी वाणांची शोधाशोध सुरू झली. आज जिल्हय़ातील २६० गावात पाच हजारावर शेतकरी देशी बियाण्यांचे पुरस्कर्ते झाले आहेत. समुद्रपूर तालुक्यातील गिरड हे गाव तर देशी वाणांची बँक म्हणून स्थापित झाली आहे. या परिसरातील ६०-७० गावांत दरवर्षी बीजोत्सव साजरा केला जातो. संस्थेशी जुळलेले कार्यकर्ते गावोगावी फिरून देशी बियाण्यांचे वाण मागवतात. त्याची चाळणी करीत देशी व परंपरागत बियाणांचे वर्गीकरण केले जाते. हे वाण पेरणीसाठी देताना त्याचे पुढील वर्षी दुप्पट बियाणे देण्याची हमी शेतकऱ्यांकडून घेतली जाते, अशी माहिती या बीजबँकेचे ‘व्यवस्थापक’ गजानन गळघाटे हे देतात.

गिरड परिसरातील पेठ, किन्ही, डोंगरगाव, अंतरगाव, शिवनगाव व अन्य गावात परंपरेने रासायनिक शेतीच होत होती. तोपर्यत रासायनिक खते व बीटी बियाण्यांमुळे जमिनीची उत्पादनक्षमता घटत असल्याचा सूर काही प्रमाणात उमटू लागला होता. याच पाश्र्वभूमीवर नैसर्गिक शेतीचे प्रवर्तक डॉ. सुभाष पाळेकर यांनी आपली भूमिका मांडली. मगन संग्रहालयाच्या संचालक डॉ. विभा गुप्ता यांनी नैसर्गिक शेतीची संकल्पना उचलून धरली. प्रारंभी चारशे शेतकऱ्यांना या शेतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सर्वानीच त्याचे प्रयोग करण्यास प्रारंभ केला. हळूहळू ही संख्या अडीच हजार शेतकऱ्यांवर पोहोचली. २००७ साली याचा आढावा घेण्यात आला. शेतकऱ्यांना दिसून आले की रासायनिक शेतीपेक्षा नैसर्गिक शेतीत ७० टक्के खर्च कमी झाला. तर नफ्याचे प्रमाण ३० टक्के होते.

संस्थेच्याच गिरड परिसरातील सहा एकर जमिनीवर विविध वाणांचे प्रयोग सुरू झाले. त्यासाठी पारंपरिक बियाणे आवश्यक होते. म्हणून परिसरातील गावांत बियाणे यात्रांच्या माध्यमातून तीन वर्ष बियाणे संकलनाचे काम झाले. सायकल व बैलबंडीतून नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते गावोगावच्या शेतकऱ्यांचा देशी वाणांचे दान मागत. हा प्रयोग यशस्वी ठरला. प्रामुख्याने चवदार स्वादाचा बंसी गहू जपला गेला. काशी टमाटर, पोपट, वाल, मिरची, उडीद, मूग, लाखोली, वांगे, कापूस, जवस यांचे बियाणे जतन झाले. परिसरातील शेतकरी २३ प्रकारचे देशी वाण पिकवू लागले. वाढत्या मागणीमुळे या बियाण्यांवर संशोधन करीत त्याचा पुरवठा करण्याचा निर्णय झाला. त्यासाठी नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेची मदत घेण्यात आली. बीटी बियाणे वर्षभरापुरतेच उपयुक्त तर हे देशी वाण दरवर्षी कामात येऊ लागले, असा अनुभव शोभा गायधने, गुणवंत गुडधे, संतोष डडमल, कमलाकर कापसे, घनश्याम भुरे हे शेतकरी सांगतात. बियाणे संगोपनाच्या कार्यात आता ११ गावातील २५२ महिला जुळलेल्या आहेत. केंद्र व राज्य सुधारित वाणांचा आग्रह धरते. पण सरळवाणास प्रोत्साहन देत नाही. त्यावर पाहिजे तसे संशोधन होत नाही. अन्यथा ३० रुपये किलोचे बियाणे व ९०० रुपये किलोचे बियाणे, असा पर्याय शेतकऱ्यांना मिळाला, अशी खंत गळघाटे व्यक्त करतात. या वाणातून किमान ५ ते ६ क्विंटल कापूस अत्यंत कमी खर्चात घेत आहोत. त्यामुळे ९-१० क्विंटलचे उत्पादन घेण्यापेक्षा हे कमी खर्चातील पाच क्विंटल आम्हाला किफायतशीरच ठरते, असेही ते निदर्शनास आणतात.

अवजारांचा प्रश्न सुटला!

मगन संग्रहालयाच्या संचालक डॉ. विभा गुप्ता सांगतात की, कोरडवाहू शेतीसाठी नैसर्गिक शेती एक उत्तम पर्याय ठरू शकतो. त्याचे प्रात्यक्षिक व पुढे नियमित स्वरूप आम्ही दाखवून दिले. शेती औजारांचा प्रष्टद्धr(२२४)्नाही दूर झाला आहे. त्यातील अडचणी दूर करण्यासाठी संस्थेने फिरते वेल्डिंग दुकान सुरू केले. गरज पडेल तेव्हा आमचे कारागीर शेतकऱ्यांना मदत करतात. देशी बियाणे सहनशील म्हणजे नैसर्गिक आपत्तींना तोंड देऊ शकते, तर संकरित बियाणे संवेदनशील म्हणजे विविध किडींना लवकर बळी पडते. जमिनीतून मोठय़ा प्रमाणात पोषक तत्त्वांचे शोषण करते. विपरीत परिस्थितीत देशी वाणच सक्षम ठरत असल्याचे शेतकरी स्वानुभवातून सांगत आहे. त्याचाच प्रचार संस्था करीत आहे.