राज्यातील शिक्षणव्यवस्थेत आमूलाग्र बदल सुचविणारा ‘ज्ञानरचनावाद’ समजून घेण्यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी चक्क शुक्रवारी येथील कुमठे बीट शाळेतील विद्यार्थ्यांकडूनच तास घेतला.

[jwplayer poPcqTHM]

सातारा जिल्हय़ातील कुमठे बीट (ता. सातारा) आणि निकमवाडी व कळंभे (ता. वाई) येथील शाळांमध्ये नव्या ज्ञानरचनावादाधिष्ठित शिक्षण दिले जाते. या शाळेला अनेक अभ्यासकांनी भेट देत इथल्या या अनोख्या पद्धतीची पाहणी केली आहे. या पाश्र्वभूमीवर तावडे यांनी देखील गुप्तपणे भेट देत इथल्या या आगळय़ा वेगळय़ा शिक्षण पद्धतीची पाहणी केली. ज्ञानरचनावादाच्या शाळेतील विद्यार्थी कसा घडतो. शिक्षण कसे दिले जाते. शिकविताना कोणती काळजी घेतली जाते. ज्ञानरचनावाद आहे तरी काय हे समजून घेण्याचा प्रयत्न तावडे यांनी या वेळी मुलांमध्ये बसून केला.

या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांना राज्य, देश, शाळा आणि मंत्री या विषयांवर निबंध लिहिण्यास सांगितले. या मुलांनी वरील विषयावर लिहिलेले निबंध पाहून मंत्रिमहोदय चकित झाले. यावेळी त्यांनी शिक्षकांशीही चर्चा करत ज्ञानरचनावाद राबविल्यानंतर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत काय फरक पडला, पारंपरिक गणित विषय शिकविण्याची पध्दत, इंग्रजी व मराठी शब्दांचा अर्थ शोधण्याची पध्दत, विद्यार्थ्यांना वाचण्याची सवय लावण्यासाठीचे उपाय, चित्रे, वस्तूंच्या माध्यमांतून गणित आदींची माहिती घेतली.

[jwplayer voXexKMV]