कस्तुरबासह ‘केईएम’ रुग्णालयातही आजपासून सुविधा; रुग्णसंख्या ४५ वर

करोना विषाणूच्या संशयित रुग्णांचे वैद्यकीय नमुने तपासण्यासाठी विलंब होऊ  नये, यासाठी राज्यात आठ नवी तपासणी केंद्रे उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी मुंबईतील दोन केंद्रांसह तीन केंद्रे गुरुवारपासून सुरू करण्यात येत आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिली. दरम्यान, करोनाचे आणखी चार रुग्ण आढळल्याने राज्यातील रुग्णसंख्या ४५ झाली आहे.

टोपे यांनी बुधवारी पुण्यात नायडू रुग्णालय आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला भेट देऊन सद्य:स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी करोना प्रतिबंधाबाबत तयारीची माहिती दिली. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात आणखी एका केंद्रासह केईएम रुग्णालयआणि पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय येथे गुरुवारपासून करोना चाचणी केंद्र सुरू होणार आहेत. पुढील आठवडय़ाभरात आणखी पाच ठिकाणी तपासणी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत, असे टोपे यांनी सांगितले. मुंबईतील जे. जे. रुग्णालयात एक आणि हाफकिन इन्स्टिटय़ूटमध्ये दोन तपासणी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.

खासगी प्रयोगशाळांनाही करोना चाचणी करण्याची परवानगी केंद्राकडून देण्यात आली आहे. मात्र, या चाचणीसाठी आवश्यक किट किंवा त्यासाठीचा खर्चही त्या प्रयोगशाळांनी स्वत: करायचा आहे. नागरिकांनी स्वखर्चाने खासगी प्रयोगशाळेतील चाचण्या करायच्या आहेत. राज्यातील करोना विषाणू संसर्गाची परिस्थिती सध्या दुसऱ्या स्तरावर आहे. ती तिसऱ्या स्तरावर जाऊ  नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आम्ही करत आहोत, असे टोपे म्हणाले.

विलगीकरण कक्षातील रुग्णांवर निर्बंध घालू नयेत. केवळ जेवण, स्वच्छता एवढेच नव्हे तर वायफाय, टीव्हीसारख्या सुविधाही देण्यास हरकत नाही, असे टोपे यांनी सांगितले. राज्यातील सर्व जिल्ह्य़ांना वेळोवेळी याबाबत जागरूक करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ  नये, मात्र यंत्रणांना सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन टोपे यांनी केले.

दरम्यान, करोनाचे चार नवे रुग्ण बुधवारी आढळले. त्यातील एक महिला रुग्ण नेदरलँडवरून दुबईमार्गे पुण्यात आली होती. फिलीपाईन्स, सिंगापूर आणि कोलंबो येथून प्रवास करून पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या तरुणास करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. मुंबई आणि रत्नागिरीमध्ये बुधवारी प्रत्येकी एक रुग्ण आढळल्याने राज्यातील करोनाबाधितांची संख्या ४५ वर पोहोचली.

एका दिवसात उपनगरी रेल्वेचे १७ लाख प्रवासी घटले 

१६ मार्चला उपनगरी रेल्वेतून ९० लाख १७ हजार प्रवाशांनी प्रवास केला होता.१७ मार्चला या प्रवासी संख्येत १७ लाखांची घट झाली.

शासकीय कार्यालयांतील उपस्थिती, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर निर्बंध

मुंबई : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपनगरी रेल्वे तसेच बसमधील गर्दीवर नियंत्रण आणण्याचा निर्णय सरकारने बुधवारी घेतला. त्यानुसार राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये एक दिवसाआड पद्धतीने रोज ५० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवण्यात येणार आहे. तसेच रेल्वे, एसटी बस, खासगी बस, मेट्रो या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्येही ५० टक्के प्रवासी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. जनतेने जीवनावश्यक वस्तूंचा, अन्नधान्य, औषधी यांचा साठा करू नये. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन कोणी व्यापारी साठेबाजी करीत असेल किंवा औषधांची, मास्कची वाढीव दराने विक्री करत असेल तर त्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

लष्करात पहिल्या रुग्णाची नोंद

करोना विषाणूचा भारतीय लष्करातील पहिला रुग्ण बुधवारी आढळला. लडाखमध्ये ३४ वर्षीय जवानाला करोनाचा संसर्ग झाल्याचे वैद्यकीय तपासणीतून स्पष्ट झाले. त्यानंतर लष्कराने सर्व कवायती, प्रशिक्षण कार्यक्रम रद्द केले.

मुंबईतील दुकाने दिवसाआड बंद

मुंबई : सार्वजनिक ठिकाणी होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी मुंबईत ५० टक्के दुकाने दिवसाआड बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळे शहरांतील बाजारपेठांतील गर्दी गुरुवारपासून कमी होण्याची शक्यता आहे.

‘साथी’तली सकारात्मकता!

हे करोना विषाणूचे संकट सर्वार्थाने अभूतपूर्व. गेल्या शतकभरात तरी जगाने हा असा एखाद्या विषाणूने घडवून आणलेला हाहाकार पाहिला नसेल. हे संकटच पूर्ण नवे. त्यामुळे त्यास सामोरे जाण्याच्या तऱ्हाही नवनव्याच असणार. आधुनिक संपर्क साधनांनी जग जवळ आले आहे, असे सांगितले जात असताना या विषाणूमुळे एकमेकांतले अंतर वाढवा असा सल्ला दिला जात आहे. मुक्त वातावरणाचे दावे केले जात असताना शब्दश: मुस्कटदाबी केली जात आहे आणि प्रवासाची अतिवेगवान साधने विकसित होत असताना आपल्याला कोंडून घ्यावे लागत आहे. हे सारेच अकल्पित. त्याचा नकारात्मक परिणाम आपण पाहातच आहोत; पण या उदासीन वातावरणातही या सगळ्यास नावीन्यपूर्ण मार्गाने सामोरे जाणारे, आशावाद निर्माण करणारे काही असतील. तुम्हीही असाल त्यापैकी एक किंवा तुमच्या पाहण्यात असतील असे कोणी.

मग पाठवा लिहून या अशा सकारात्मक कहाण्या इतरांनाही कळाव्यात यासाठी. त्यातील निवडक कहाण्यांना अंकात प्रसिद्धी दिली जाईल. कमाल शब्दमर्यादा ५००. सोबत काही छायाचित्रे असली तर उत्तम. आमचा ईमेल:  coronafight@expressindia.com

या साथकालास सामोरे जाण्यासाठी हवी आहे  ती सकारात्मकता!!