राज्यात सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीवरून पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे नाराज नसून त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करण्यात आली आहे. प्रशासकीय सेवेत सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या ही नेहमीची बाब असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले.  
राज्यात एकाच दिवशी ४२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या निर्णयावरून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केल्याची बातमी प्रकाशित झाल्यावर त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, खडसे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे सरकारमध्ये कुठलाही निर्णय घेताना त्यांना विश्वासात घेऊनच तो घेतला जातो. ते नाराजी नसून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. नवे सरकार स्थापन झाल्यानंतर सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करणे ही नेहमीची बाब असल्याने खडसे यांच्या नाराजीचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे फडणवीस म्हणाले.
मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच केला जाणार आहे. भाजप-शिवसेनेत नियमानुसार जे जागावाटप झाले आहे, त्यानुसार मंत्रिपद दिले जाईल. मंत्रिपदासाठी शिवसेनेकडून नावे आली की, लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

लेखी पत्र दिले नाही
सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणतेही लेखी पत्र दिलेले नाही, असे स्पष्टीकरण महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिले. ४२ अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून खडसे यांनी नाराजी व्यक्त केली होती.