News Flash

फडणवीस आणि महाजनांमुळे माझं तिकीट कापलं; एकनाथ खडसे यांचा गौप्यस्फोट

राज्यातील नेतृत्वावर अनेक आरोप

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्ता स्थापन झाली असली, तरी राजकीय भूकंप सुरूच आहेत. भाजपाचे राज्यातील महत्त्वाचे नेते एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपामुळे फडणवीस यांच्याविरोधातील नाराजी पहिल्यांदाच समोर आली आहे. स्वतःच्या राजकारणासाठी फडणवीस आणि महाजन यांनी मला तिकीट मिळू दिल नाही. त्यामुळेच माझं तिकीट कापण्यात आलं, असा गौप्यस्फोट खडसे यांनी केला आहे. खडसे यांनी पक्षाच्या राज्यातील नेतृत्वावर अनेक आरोप केले आहेत.

राज्याच्या सत्तेतून पायउतार व्हाव्या लागलेल्या भाजपात आता नाराजीचा सूर अधिक गडद होऊ लागला आहे. आतापर्यंत नाव न घेता टीका करणारे भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांचे नाव घेत टीका केली आहे. एकनाथ खडसे यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाजपाच्या आजच्या स्थितीला राज्यातील नेतृत्वाला जबाबदार धरले आहे.

फडणवीस, महाजन यांनी तिकीट मिळू दिलं नाही

खडसे यांनी तिकीट कापण्यामागे फडणवीस आणि महाजन यांचा हात असल्याचं म्हटलं आहे. “भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीस यांनी आपल्याविषयी नाराजी व्यक्त केली. फडणवीस आणि महाजन यांनी मला तिकीट देण्यास पक्षश्रेष्ठींकडे विरोध केला. त्यावर आम्ही विचार करून निर्णय घेऊ असं पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं होतं. पण, तिकीट कापण्यात आलं. कोअर कमिटीमधील आपल्या जवळच्या मित्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर आपल्याला माहिती दिली,” असा गौप्यस्फोट खडसे यांनी केला आहे. आपल्याला तिकीट न दिल्यानं माझ्यासह अजून दहा बारा जागांचं नुकसान पक्षाला सोसावं लागलं. एखाद दुसऱ्या व्यक्तीच्या हट्टापाई पक्षाचं नुकसान झाल्याचं सांगत खडसे यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

भाजपात आहे आणि राहिल –

पक्ष सोडण्याच्या वृत्त एकनाथ खडसे यांनी फेटाळून लावले आहे. “पक्षाचे कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेऊन मी त्यांना सर्व सांगितलं. त्यांनी माझ्यावर झालेल्या अन्यायाची दखल घेण्याचं आश्वासन दिलं. पण, त्यांच्यासोबतच्या भेटीत पूर्ण समाधान झालं नाही. मी भाजपातच आहे आणि भाजपातच राहणार आहे,” असा पुनर्उच्चारही खडसे यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2020 7:17 am

Web Title: eknath khadse serious allegation on fadnavis and mahajan bmh 90
Next Stories
1 पवारांच्या विरोधात मोहिते-पाटील गटाची बाजी
2 ‘अ’ जीवनसत्त्वयुक्त ‘गोल्डन राईस’ला भारतात परवानगीची प्रतीक्षा
3 रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे रोहन बने
Just Now!
X